Gurgaon News : हरियाणाच्या गुरुग्राममध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. हॉटेलमध्ये माऊथ फ्रेशनरमुळे ५ जणांना रक्ताच्या उलट्या झाल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. या माऊथ फ्रेशनरमुळे पाच जणांची प्रकृती बिघडली असून दोन जण अत्यवस्थ आहेत. याघटनेमध्ये रेस्टॉरंटमध्ये लोकांना माऊथ फ्रेशनरच्या जागी ड्राय आईस दिल्याने ही घटना घडली आहे. ड्राय आईस खाऊन ग्राहकांच्या तोंडातून रक्त येऊ लागलं. यामुळे पाच जणांची प्रकृती बिघडली असून रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यातील दोन जण अत्यवस्थ आहेत.
घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल
या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही लोकांच्या तोंडातून रक्त येत असल्याचं दिसत आहे. माऊथ फ्रेशनर खाल्ल्यानंतर या लोकांची तब्येत बिघडल्याचं सांगितलं जात आहे. गुरुग्रामच्या एका हॉटेलमधील धक्कादायक प्रकार घडला आहे. अंकित कुमार नावाच्या व्यक्तीने रेस्टॉरंटविरोधात आरोप केले असून या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या शनिवारी तीन जोडप्यांचा ग्रुप वाढदिवस साजरा करण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये गेला होता. त्यांच्या जेवणानंतर, वेट्रेसने ग्रुपला माउथ फ्रेशनर ऑफर केले, मात्र, त्याऐवजी त्यांना कोरड्या बर्फाचे दाणे दिले, ज्यामुळे त्यांची जीभ आणि टाळू खराब झाली, अशी माहिती पोलिस आणि रेस्टॉरंटने दिली. याप्रकरणी विषबाधा करून नुकसान केल्याच्या आरोपाखाली वेट्रेसवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.