नवी दिल्ली : गेल्या वर्षी जगभरात एकूण ८०० कोटी लस उत्पादन झाले व त्याचे वितरणही झाले. यापैकी निम्मे म्हणजेच ४०० कोटी लसींचा पुरवठा एकट्या भारताने केला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली. भारताने गत काही वर्षात आरोग्य व्यवस्थेत सुधारणा केल्या. तसेच जागतिक आरोग्य सेवा क्षेत्रातही भारताने महत्त्वाचे योगदान दिल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
देशाची राजधानी नवी दिल्ली येथे ‘यूएस-इंडिया स्ट्रेटेजिक पार्टनरशिप फोरम’द्वारे आयोजित वार्षिक ‘इंडिया लीडरशिप परिषद-२०२४’ ला केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी संबोधित केले. यावेळी त्या म्हणाल्या की, औषधनिर्माण क्षेत्रात जागतिक नेता म्हणून भारताचा उदय झाला आहे. भारत हा जेनेरिक औषधींचा तिसरा सर्वात मोठा उत्पादक व प्रमुख पुरवठादार देश बनला आहे. जगभरात वाटप होणाऱ्या लसींचे निम्म्याहून अधिक डोस भारतात बनवण्यात आले आहेत. गतवर्षी जगात बनवलेले व वाटप झालेल्या ८०० कोटींपैकी ४०० कोटी लसींचा पुरवठा भारताने केला, असे त्यांनी सांगितले.