उत्तर प्रदेश : कासगंज येथे भीषण अपघातात ट्रॅक्टर-ट्रॉली तलावात कोसळल्याने 22 जणांच्या मृत्यू झाला आहे. तर मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. तर 10 जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे सर्व यात्रेकरुन गंगा नदीत पवित्र स्थान करण्यासाठी कादरगंजला निघाले होते.
माघ पौर्णिमेच्या निमित्ताने हे सर्व भाविक गंगा नदीत पवित्र स्थान करण्यासाठी निघाले होते. पण रस्त्यातच कासगंज येथे त्यांचा अपघात झाला.
ट्रॅक्टर चालक दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी झाली. यानंतर ती 7 ते 8 फूट खोल तलावात गेली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य केले. शोधकार्यात हाती आलेल्या जखमींना स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केले.
कासगंजच्या जिल्हाधिकारी सुधा वर्मा यांच्या म्हणण्यानुसार, “अपघात झाला तेव्हा ट्रॅक्टरमध्ये 30 लोक होते. एटाहून काही भाविक सकाळी कासगंजला जात असताना ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली. अपघात झाला तेव्हा ट्रॉलीमध्ये 25-30 लोक बसले होते. गावकऱ्यांनी पीडितांना वाचवलं आहे,” असंही त्यांनी म्हटले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. ‘कासगंज जिल्ह्य़ातील अपघातात झालेली जीवितहानी अत्यंत हृदयद्रावक आहे. कुटुंबाप्रती माझ्या संवेदना आहेत. सर्व जखमींवर योग्य ते मोफत उपचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.