कोझिकोड: केरळात पुन्हा डोके वर काढलेल्या निपाह विषाणूमुळे मलप्पुरम येथील एका १४ वर्षीय मुलाचा रविवारी मृत्यू झाला. आदल्या दिवशी मुलाला निपाहचा संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. निपाह विषाणूच्या संसर्गामुळे गेलेल्या पहिल्या बळीनंतर केंद्र सरकारकडून राज्य सरकारच्या मदतीसाठी केंद्रीय पथक पाठवले जाणार आहे.
मलप्पुरम शहरातील पांडिक्कडमधील रहिवासी असलेल्या या मुलाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. बेशुद्धावस्थेतच हृदयविकाराच्या झटका आल्याने त्याचा सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. त्याला वाचविण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरल्याचे राज्याच्या आरोग्यमंत्री विना जॉर्ज यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार मुलाच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सद्यःस्थितीत चार संशयित रुग्ण वैद्यकीय रुग्णालयात दाखल आहेत. यापैकी एक जण अतिदक्षता विभागात असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.
मुलाच्या संपर्कात आलेले एकूण २४६ जण असून यापैकी ६३ जण हे अधिक धोक्याच्या श्रेणीत आहेत. या सर्वांची देखील चाचणी केली जाणार आहे. शिवाय, विषाणूच्या उद्रेकाचा केंद्रबिंदू असलेल्या पांडिक्कडसह आजूबाजूच्या ३३ हजार घरांतील तापाने फणफणलेल्या रुग्णांचा शोध घेतला जाणार असल्याचे जॉर्ज म्हणाल्या. गतवर्षी ऑस्ट्रेलियातून मागवलेल्या आणि पुण्यातील राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था अर्थात एनआयव्हीमध्ये ठेवलेले मोनोक्लोनल अॅण्टिबॉडी राज्यात दाखल झाल्याची माहिती जॉर्ज यांनी दिली.