नवी दिल्ली : सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणणे आणि अध्यक्षांचा अवमान केल्याप्रकरणी लोकसभेने गुरूवारी 14 सदस्यांना सुरु असलेल्या संसदेच्या अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित केले. निलंबन दोन भागात करण्यात आले. प्रथम काँग्रेसच्या पाच सदस्यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर कनिमोझी करुणानिधींसह आणखी नऊ खासदारांचे निलंबन करण्यात आले. तत्पूर्वी, टीएमसीचे राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांनाही उर्वरित सत्रासाठी राज्यसभेतून निलंबित करण्यात आले होते. अशा प्रकारे लोकसभा आणि राज्यसभेतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची एकूण संख्या 15 झाली आहे.
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसचे टीएन प्रतापन, हिबी इडन, जोतिमणी, रम्या हरिदास आणि डीन कुरियाकोसे यांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला. जोशी यांचा प्रस्ताव सभागृहाने आवाजी मतदानाने मंजूर केला.
संसदेच्या सुरक्षेत झालेल्या हलगर्जीपणावरून विरोधकांनी आज लोकसभेत गदारोळ केला. वाईट वर्तनामुळे द्रमुकच्या कनिमोझी करुणानिधींसह 9 खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले. बेहानन, व्हीके श्रीकंदन, मोहम्मद जावेद, पीआर नटराजन, के सुब्रमण्यम, एसआर पार्थिबन, एस वेंकटेशन आणि मणिकम टागोर यांना निलंबित करण्यात आले आहेत. यानंतर सभागृहाचे कामकाज शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
यामध्ये काँग्रेसचे सर्वाधिक निलंबित खासदार आहेत . एकूण नऊ खासदारांना निलंबित करण्यात आले. डीएमकेचे दोन, सीपीएमचे दोन, सीपीआयचे एक आणि टीएमसीच्या एका खासदाराला निलंबित करण्यात आले आहे.