अमेरिका : लॅटीन अमेरिकन देश इक्वाडोरमध्ये मंगळवारी (ता. ९) एक धक्कादायक घटना घडली. थेट प्रक्षेपणादरम्यान १३ बंदुकधारी व्यक्ती अचानक स्टुडिओमध्ये घुसल्या आणि त्यांनी अँकरला धमकवायला सुरुवात केली. त्यांच्या हातात स्फोटके देखील होती. दरम्यान, अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. थेट प्रक्षेपण सुरु असताना टीव्ही स्टुडिओवर हल्ला करणाऱ्या या १३ जणांवर दहशतवादाचा आरोप लावण्यात येणार असल्याची माहिती इक्वेडोर सरकारने दिली आहे.
इक्वाडोरमथील पोर्ट सिटी गुआयाकिलमध्ये टीसी टेलिव्हिजन नेटवर्कच्या स्टुडिओमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. मुख्य म्हणजे हा सर्व प्रकार लाईव्ह टीव्हीवर सुरु होता. तोंडावर काळा कपडा, हातात बंदूक आणि स्फोटकांसह १३ दहशतवादी टीव्ही स्टुडिओमध्ये घुसले आणि धमकावण्यास सुरुवात केली. त्यामुळे स्टुडिओमधील उपस्थित भांबावले. दरम्यान, दहशतवाद्यांनी उपस्थितांना शांत न बसल्यास बॉम्ब टाकण्याची धमकी दिली. या घटनेचे थेट प्रक्षेपण सुमारे १५ मिनिटे सुरु होते.
इक्वाडोरच्या राष्ट्रीय पोलीस प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व अधिकाऱ्यांनी मास्क घातलेल्या घुसखोरांना अटक केली असून, बंदूकधाऱ्यांकडून बंदुका आणि स्फोटके जप्त केली आहेत. या भयावह घटनेबाबत बोलताना टीसी टेलिव्हिजनच्या बातम्या प्रमुख अलिना मॅनरिक म्हणाल्या की, मास्क घातलेल्या पुरुषांचा एक गट इमारतीत घुसला तेव्हा ती स्टुडिओसमोरील नियंत्रण कक्षात होती. घुसखोरांपैकी एकाने त्यांच्या डोक्यावर बंदूक लावली आणि त्याला जमिनीवर बसण्यास सांगितले. तोपर्यंत घटनेचे थेट प्रक्षेपण केले जात होते, पण सुमारे १५ मिनिटांनी स्टेशनचा सिग्नल कट झाला. या प्रकारामुळे इक्वाडोमध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे.
इक्वाडोरमध्ये टीव्ही स्टुडिओवर हल्ला झाला, तर दुसरीकडे रात्रीच ७ पोलिसांचे अपहरण झाले, त्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. याशिवाय एक धोकादायक ड्रग माफिया जोस अडोल्फो मॅकियास उर्फ फिटो इक्वेडोरमधील तुरुंगातून फरार झाला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर देशातील परिस्थिती लक्षात घेता राष्ट्राध्यक्ष डॅनियल नोबोआ यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. राष्ट्रपतींनी तुरुंगांवर लष्कराने पहारा ठेवण्याचे आदेश दिले. याशिवाय देशात कार्यरत असलेल्या २० अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांना दहशतवादी गट म्हणून घोषित करण्यात यावे, असा आदेश दिला होता.