मुरैना (मध्य प्रदेश) : सोशल मीडियावर टाकण्यासाठी रील बनवताना गळफास लागून एका ११ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशच्या मुरैना जिल्ह्यात घडली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
जिल्ह्यातील अंबाह गावात शनिवारी सायंकाळच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. सातवीच्या वर्गात शिकणारा करण परमार नामक मुलगा मित्रांसोबत खेळत होता. यादरम्यान रील बनवण्याचा विचार करणच्या डोक्यात आला. त्यानुसार करणने मित्राला मोबाईल चित्रीकरण करण्यास सांगितले. गळफास लावून आत्महत्येचा बनाव करण्यासाठी करण झाडावर चढला. मात्र, मस्करीतून सुरू असलेले हे नाटक खरोखरच गळफास लागल्याने त्याच्या जीवावर बेतले.