नवी मुंबई: दारुची पार्टी करण्यासाठी बसलेल्या पाच मित्रांमध्ये झालेल्या भांडणात चौघा मित्रांनी एका मित्रावर चाकू हल्ला केल्याने त्या मित्राची हत्या झाल्याची घटना पनवेलमध्ये घडली. या घटनेनंतर चौघा मित्रांनी आपला मित्र बेशुद्ध पडल्याचे सांगून जखमी विजयला अॅम्ब्युलन्समधून उपचारासाठी पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, विजयचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर चौघा मित्रांनी रुग्णालयातून पलायन केले होते.
या घटनेतील मृत तरुणाचे नाव विजय बाळासाहेब कळसे (२७) असे असून तो मानखुर्द येथील जयहिंद नगरमध्ये राहत होता. तर त्याचे मित्र रवी मेवाती, राहुल मेवाती, तरुण वाल्मिकी व त्यांचा चौथा सहकारी हे चौघे वेगवेगळ्या ठिकाणी राहण्यास होते. हे पाचही जण एकमेकांचे मित्र असल्याने रविवारी सायंकाळी पनवेलमधील उसलों येथील ओमेगा सोसायटीत राहणाऱ्या राहुल मेवाती याच्या घरी पार्टीसाठी एकत्र आले होते. दारुच्या नशेमध्ये त्यांच्यात वादावादी होऊन भांडणामध्ये त्यातील एकाने विजयवर चाकूने हल्ला केला. त्यामुळे विजय गंभीर जखमी होऊन पडल्यानंतर चौघांनी अॅम्ब्युलन्स बोलावून त्यातून विजयला उपजिल्हा रुग्णालयात नेले, या वेळी चौघे मित्र अॅम्ब्युलन्ससोबत उप जिल्हा रुग्णालयात गेले होते.
उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. घाटे यांनी जखमी विजय कळसे याची तपासणी केली असता, विजयच्या छातीच्या डाव्या बाजूला तीक्ष्ण हत्याराने भोसकल्याची जखम आढळून आली. तसेच त्याचा मृत्यू झाल्याचे देखील आढळून आले. विजयचा मृत्यू झाल्याचे समजताच मित्रांनी रुग्णालयातून पलायन केले होते. पनवेल शहर पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर प्रथम उपजिल्हा रुग्णालयात त्यानंतर उसली येथील ओमेगा सोसायटीत धाव घेतली. मात्र, पोलिसांना मृत वियजचे मित्र सापडले नाहीत. त्यानंतर पोलिसांनी मृत विजयच्या चारही मित्राविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला होता.
विजयवर चाकूने हल्ला करणारा मित्र अटकेत
पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू केल्यानंतर रवी मेवाती हा आरोपी कामोठे येथील नातेवाईकाकडे लपून बसल्याची माहिती मिळाल्यांनतर पोलिसांनी त्याला सोमवारी ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, दारुच्या नशेत विजयसोबत वादावादी झाली होती. या वेळी विजयने मारहाण केल्याने रागात विजयवर चाकू हल्ला केल्याची कबुली रवीने दिली. त्यानुसार पोलिसानी रवि मेवाती याला अटक केली आहे. या हत्या प्रकरणात इतर तिघांचा समावेश आहे की नाही, याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.