मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय प्राप्त झाला आहे. तर महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागलाय आहे. या महायुतीच्या विजयाचे खरे शिल्पकार ठरले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस! त्यांचा आजवरचा प्रवास प्रेरणादायी आणि थक्क करणारा आहे. 1989 मध्ये भाजपचे नागपुरातील वॉर्ड अध्यक्ष, त्यानंतर नागपूरचे नगरसेवक म्हणून फडणवीस यांचा राजकीय प्रवास सुरु झाला होता. तो आता तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्र्यापर्यंत येऊन पोहचला आहे. सर्वात कमी वयाचे दुसरे मुख्यमंत्री असा मान मिळालेले फडणवीस आता पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावर विराजमान होणार आहेत. त्यांच्या या प्रवासाबद्दल जाणून घेऊ.
मागील पाच वर्षांतील राजकीय घडामोडींमध्ये आघाडीवर असणार नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस! सर्वाधिक आमदार असताना सुद्धा शिवसेना-भाजप युती तुटल्यामुळे हातचे गेलेले मुख्यमंत्रिपद असो की महाविकास आघाडीचे सरकार कोसळ्यानंतर मुख्यमंत्रिपदाऐवजी उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागण्याचा प्रसंग असो, लोकसभा निवडणुकीत मिळालेला दारूण पराभव या सर्व परिस्थितीमध्ये फडणवीस यांनी कमालीच्या संयमाचे दर्शन घडवल. आता त्यांना या संयम आणि त्यागाचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. ते उद्या संध्याकाळी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
नागपूरचे सर्वात कमी वयाचे महापौर..
कायदा आणि त्यानंतर बिझनेस मॅनेजमेंटची पदवी प्राप्त केलेले देवेंद्र फडणवीस हे महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय होते. त्यानंतर 1989 मध्ये ते भाजपचे नागपूर शहरातील वॉर्ड अध्यक्ष बनले. पुढे वयाच्या 22 व्या वर्षी 1992 मध्ये ते नगरसेवक बनले. त्यानंतर 1997 मध्ये वयाच्या 27 व्या वर्षी ते नागपूरचे महापौर बनले. ते नागपूरचे सर्वात कमी वयाचे महापौर ठरले होते. सर्वात कमी वयात महापौर बनणारे दे देशातील दुसरे नेते बनले. देशातील सर्वात कमी वयाचे महापौर हा फडणवीस यांचा विक्रम 2020 मध्ये केरळमधील आर्या राजेंद्रन (तिरुवअनंतपूरच्या महापौर) या 21 वर्षीय तरुणीने मोडित काढला आहे.
राजकारणातील आलेख चढताच..
देवेंद्र फडणवीस हे 1999 च्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले. त्यानंतरच्या सर्व निवडणुकांमध्ये ते विजयी झाले आहेत. त्यांची 2001 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाली. 2010 मध्ये ते भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि त्यानंतर 2013 मध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी राज्यभरात दौरे करून पक्षाची बांधणीचे काम केले. पक्षाच्या विस्तारावर ते सातत्याने भर देत आले. त्यांच्या यशाचा आलेख नेहमी चढतच राहिलेला आहे.
गजलला पहाटेचा शपथविधी…
फडणवीस हे 2014 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. 2019 च्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक आमदार विजयी झाले होते, परंतु, मुख्यमंत्रिपद विभागून हवे, या उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे शिवसेना-भाजपची युती तुटली आणि फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची संधी गमवावी लागली. तशाही परिस्थितीत त्यांनी 23 नोव्हेंबर 2019 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तो पहाटेचा शपथविधी देशभरात गाजला होता. मात्र बहुमताअभावी त्यांचे मुख्यमंत्रिपद टिकू शकले नाही.
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री, तर फडणवीस उपमुख्यमंत्री..
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. तेव्हा फडणवीस विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत आले. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची कामगिरी लक्षात राहणारी ठरली. त्यांनी सरकारला अनेकवेळा धारेवर धरले आणि घाम फोडला. अडीच वर्षांनंतर अखेर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि फडणवीस यांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला, असे सर्वाना वाटत असताना दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी शिवेसेनेतून 40 आमदार घेऊन भाजपसोबत आलेल्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. फडणवीस यांना त्यावेळी नाराजी लपवता आली नव्हती. पक्षाच्या आदेशानुसार त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले.
महायुतीच्या विजयाचे शिल्पकार..
आता विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले आहे. एकट्या भाजपला 132 जागा मिळाल्या आहेत. महायुतीतील शिवसनेला 57 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत. महायुतीला 288 पैकी 230 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये महाविकास आघाडीचा चांगलाच धुव्वा उडाला आहे. भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचा रणनीतीमुळे हे यश मिळाल्याच बोललं जात आहे. महाराष्ट्रातील पक्षसंघटनेवर त्यांची मजबूत पकड आहे.