मुंबई : लोकसभा निवडणुकीत आपण घासून नाही तर ठासून विजय मिळवला आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. मग आता तुमचं हिंदुत्व कुठं गेलं?, असा सवाल करत एकनाथ शिंदे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आज शिवसेना पक्षाचा ५८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, आज शिवसेनेला ५८ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे माझ्या मनामध्ये वेगळा आनंद आहे. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली आणि मराठी माणसांसाठी न्याय हक्क मिळावा, नोकऱ्या मिळाव्या यासाठी लढा दिला. त्यानंतर पुढे शिवसेनेची भूमिका वाढत गेली. शिवसेना पूर्ण देशभरामध्ये हिंदुत्वाचा गौरव करणारी संघटना म्हणून लोकप्रिय झाली, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पुढे म्हणाले, ठाणे, कल्याण, छत्रपती संभाजीनगर आपण जिंकलं आहे. दुसरीकडे कोकणात ठाकरे गटाला एकही जागा मिळू शकली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आपण घासून नाही तर ठासून विजय मिळवला आहे. शिवसेनेच्या हक्काच्या मतदारांनी आपल्या शिवसेनेवर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे मनापासून सर्वासमोर मी नतमस्तक होतो, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
जनतेच्या विश्वासाला आपण कधाही तडा जाऊ देणार नाही, हा शब्द मी देतो. आज बाळासाहेब ठाकरे असते तर काय म्हणाले असते? जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…. आज त्यांचा वारसा सांगणाऱ्यांना हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटू लागली आहे, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही : एकनाथ शिंदे
शिवतीर्थावर भाषण करताना सर्व इंडिया आघाडीचे नेते होते. पण त्या ठिकाणी उद्धव ठाकरे हे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…, असं म्हणू शकले नाहीत. आजही वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो म्हणाले नाही.
मग तुमचं हिंदुत्व कसलं आहे? बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. गर्व से कहो हम हिंदू है, ही गर्जना बाळासाहेबांनी देशात गाजवली. आता उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व कुठं गेलं? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे याना केला.