मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहीचा गैरवापर केल्याचा प्रकार समोर आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बनावट सही करून स्वतःला त्यांचा विशेष कार्य अधिकारी असल्याचं सांगत एका व्यक्तीने लोकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लेटरहेड आणि शिक्क्याचा वापर करून एका आरोपीने फसवणूक केल्याचं प्रकरण ताज असतानाच आता अजित पवारांच्या सही आणि लेटरहेडचा देखील गैरवापर झाल्याचं प्रकार उघड झाला आहे. प्रवीण साठे (वय 42) असे आरोपीचे नाव आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विशेष कार्य अधिकारी असल्याची बतावणी करत एक व्यक्ती अजित पवारांच्या बनावट सह्या करत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या आरोपीकडून अजित पवार यांचं बनावट लेटरहेड देखील बनवण्यात आलं होतं. अजित पवारांची बनावट सही करणारा आणि त्यांचा विशेष कार्य अधिकारी असल्याचं सांगणार्या प्रवीण साठेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपी प्रवीण साठे हा मूळचा सातारचा असल्याची माहिती मिळत आहे. तर तो सरकारी अधिकारी असल्याचं सांगत लोकांची आर्थिक फसवणूक करत असल्याची तक्रार पुण्यातील अतुल शितोळे यांनी मलबार हिल पोलिसांकडे दाखल केली आहे. त्यानुसार आता साठेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याने अजित पवारांच्या सहीद्वारे किती आणखी किती जणांची फसवणूक केली आहे? याचा तपास पोलिस करत आहेत.