मुंबई: वरळीतील हिट अँड रन प्रकरणात दररोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणातील सत्य बाहेर आणण्यासाठी पोलिसांनी २३ वर्षीय आरोपी मिहिर शहा आणि त्याचा ड्रायव्हर राजऋषी बिदावत यांना समोरासमोर बसवून चौकशी केली. यावेळी दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. दुचाकीला धडक दिल्यानंतर आपण चालकासह जागा बदलल्याची कबुली शहाने दिली. एवढेच नाही तर आरोपींच्या उपस्थितीत घटनास्थळी पोलिसांनी संपूर्ण अपघाताचे नाट्य रूपांतर केले.
मिहीर शहा आणि त्याचा चालक बिदावत यांनी दावा केला की, दुचाकीला धडकल्यानंतर ही महिला कारखाली अडकली हे त्यांना माहित नव्हते. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. त्याचवेळी शहा याने खंत व्यक्त करत आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप होत असल्याचे सांगितले.
मुंबईतील वरळी परिसरात भरधाव वेगात आलेल्या बीएमडब्ल्यू कारने कावेरी नाखवा नावाच्या महिलेला चिरडले होते. कार महिलेला सुमारे दोन किलोमीटरपर्यंत फरफटत घेऊन गेली होती. या अपघातात त्यांचे पती प्रदीप नाखवा हे देखील जखमी झाले आहेत. अपघातानंतर मिहीर दोन दिवसांपेक्षा जास्त काळ बेपत्ता होता.
या संपूर्ण प्रकरणावरून पोलिसांनी मिहीरचा ड्रायव्हर राजऋषी बिदावत यालाही अटक केली होती. त्यानंतर मिहीरने वडील राजेश शहा यांना फोन करून घटनेची माहिती दिली. यानंतर, राजेश यांनी आपल्या मुलाला शहर सोडण्यास सांगितले. तसेच राजऋषी अपघाताची जबाबदारी घेईल, असं देखील म्हटले. वडिलांशी बोलल्यानंतर मिहीर इकडे तिकडे लपून बसू लागला.
या संपूर्ण घटनेपूर्वी मिहीर शहा आणि त्याचे मित्र शनिवारी रात्री एका बारमध्ये गेले होते. उत्पादन शुल्क विभागाच्या एका अधिकाऱ्याने यापूर्वी सांगितले होते की, बार कर्मचाऱ्यांनी मिहीरला दारू दिली होती. बार व्यवस्थापनाने शहा याच्यावर बनावट ओळखपत्र दाखवल्याचा आरोप केला आहे.