मुंबई: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे २७ सप्टेंबर २०२४ रोजी जागतिक पर्यटन दिन २०२४ साजरा करण्यात येणार असून युनायटेड नेशन टुरिझम यांच्याद्वारे सन २०२४ करिता जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य ‘पर्यटन आणि शातंता’ हे घोषित करण्यात आले आहे. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारित असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालये यांच्यातर्फे ‘पर्यटन व शांतता’ या विषयाच्या अनुषंगाने परिसंवाद, चित्रकला व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांनी दिली आहे.
यावर्षी जॉर्जियाची राजधानी तीबीलीसी येथे २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जाईल. जागतिक पर्यटन दिन हा केंद्रीय पर्यटन मंत्रालय, महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग यांच्याद्वारे विविध उपक्रमांतून साजरा केला जातो. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत ‘एमटीडीसी’ची प्रादेशिक कार्यालये, पर्यटक निवासे, उपाहारगृहे, बोट क्लब्स, कलाग्राम इ. ठिकाणी २७ सप्टेंबर २०२४ पर्यंत पर्यटनाशी निगडित विविध उपक्रमांची अंमलबजावणी करत ‘पर्यटन दिन’ साजरा करण्यात येणार आहे.
एमटीडीसी प्रादेशिक कार्यालयांमार्फत जागतिक पर्यटन दिनानिमित्त परिसंवाद आयोजित केले जाणार आहेत. यामध्ये नामवंत व्यक्ती, पर्यटन तज्ज्ञ व पर्यटन व्यावसायिकांना आमंत्रित केले जाणार आहे. त्याचबरोबर निबंध स्पर्धांचे प्रत्येक प्रादेशिक स्तरावर आयोजन करण्यात येणार आहे. निबंध स्पर्धेसाठी ‘पर्यटन शांतता स्थापित करण्याचे एक साधन’, ‘पर्यटन व जागतिक शांतता’, ‘महाराष्ट्राची पर्यटन स्थळे व त्यांचा शांतता संदेश’, ‘माझ्या स्वप्नातले पर्यटन’, ‘भारत व पर्यटन शांततेचे दूत आणि प्रतीक’ असे विषय ठेवण्यात आले आहेत. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून ‘पर्यटन व शातंता’ या घोषवाक्याशी निगडित प्रत्येक प्रादेशिक व्यवस्थापकांच्या अखत्यारितील शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांशी चित्रकला स्पर्धा देखील आयोजित करण्यात येणार आहे.