मुंबई : मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. खाद्यपदार्थांच्या फॅक्टरीत चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरवर काम करताना कर्मचाऱ्याचा शर्ट अडकून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना वरळी येथील नरिमन भाटनगर परिसरात घडली आहे. या प्रकरणी फॅक्टरी मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूरज यादव (वय-19) असं मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.
नेमकं काय घडलं?
सूरज यादव हा सचिन कोठेकर यांच्या चायनीज पदार्थांच्या गाडीवर कामाला होता. ही फॅक्टरी सचिन कोठेकर (वय 32) यांच्या मालकीचीअसून या ठिकाणी सुरज हा गेल्या तीन-चार महिन्यांपासून काम करत होता. त्याचा चुलत भाऊ महेश यादव याने दिलेल्या तक्रारीनुसार, चायनीज भेळ आणि भजी तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल ग्राईंडर मशिनवर तयार केला जातो. हे मशिन नरिमन भाटनगर येथील एका खोलीत ठेवले होते. सचिन यांनी सूरजला कच्चा माल आणण्यासाठी ग्राईंडर असलेल्या खोलीकडे पाठवले. सूरज मशिनमधून माल काढत असताना मशिनमध्येच अडकला. या संदर्भातील माहिती मिळताच सचिन कोठेकर आणि इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत, पोलिसांच्या मदतीने सूरजला मशिनमधून बाहेर काढले. त्यावेळी तो गंभीर जखमी झाला होता. तेव्हा त्याला तात्काळ केईएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच सूरजला मृत घोषित केले. पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत सूरजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.
सुरज यादवला ग्राइंडर चालवण्याचा कोणताही पूर्वानुभव किंवा तांत्रिक ज्ञान नव्हते. या ठिकाणी सुरक्षेच्या योग्य उपाययोजना आणि प्रशिक्षण न देता कोठेकर यांनी सुरजला हे काम दिल्याचा आरोप त्याच्या नतेवाईकांनी केला आहे. सदर घटनेनंतर दादर पोलिसांनी फॅक्टरीचा मालक सचिन कोठेकर विरोधात गुन्हा दाखल केला. निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदरील घटना CCTV कैद झाल्याचंही म्हटलं गेलं.
मुंबईतील घटना , चायनीज पदार्थ तयार करणाऱ्या फॅक्टरीमध्ये पकोड्याच्या ग्राइंडरजवळ अडकून तरुणाचा मृत्यू pic.twitter.com/2vRZyPCEyA
— VIRALबाबा (@viralmedia70) December 16, 2024