मुंबई : राज्य सरकार बरोबरच केंद्र सरकार देखील देशातील नागरिकांसाठी अनेक वेगवेगळ्या योजना सुरू करत आहे. अशातच आता महिलांना सशक्तीकरणासाठी आणखी एका नव्या योजनेची सुरुवात केंद्र सरकार सुरु करत आहेत. या योजनेचे नाव विमा सखी योजना असे असून त्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज विमा सखी योजना लॉन्च करण्यात येणार आहे. विमा सखी योजना ही भारतीय आयुर्विमा महामंडळाची नवी योजना आहे. ही योजना काय आहे? महिलांना नेमका कोणता आर्थिक लाभ होऊ शकतो? हे जाणून घेऊ या…
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज म्हणजेच 9 डिसेंबर रोजी हरियाणाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते या योजनेचा शुभारंभ करणार आहेत. भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी या भारत सरकारच्या मालकीच्या विमा कंपनीकडून ही योजना राबवण्यात येत आहे.
काय आहेत योजनेच्या अटी?
या योजनेअंतर्गत आगामी तीन वर्षांत दोन लाख महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या योजनेत महिलांना सहभागी होण्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. या योजनेसाठी महिलांचे किमान शिक्षण इयत्ता 10 वी पर्यंत झालेले असणे आवश्यक आहे. तसेच महिलेचे किमान वय 18 वर्षे पूर्ण झालेले असायला हवे.
योजनेअंतर्गत लोकांमध्ये आर्थिक समज वाढवण्यासाठी आणि विम्याचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी शिक्षित महिलांना पहिली तीन वर्षे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणादरम्यान महिलांना काही पैसेही मिळतील. तीन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर महिला एलआयसी एजंट म्हणून काम करू शकतील. पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या विमा सखींना एलआयसीमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर काम करण्याचीही संधी दिली जाईल.
दर महिन्याला मिळणार 7 हजार रुपये
विमा सखी योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 7 हजार रुपये मिळतील. दुसऱ्या वर्षी ही रक्कम 6 हजार केली जाईल. तर तिसऱ्या वर्षी स्टायपेंडची ही रक्कम 5000 रुपये होईल. महिलांनी आपले टार्गेट पूर्ण केल्यानंतर त्यांना कमीशनदेखील दिले जाणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 35 हजार महिलांना विमा एजंट म्हणून रोजगाराची संधी दिली जाणार आहे.