मुंबई : साकीनाका येथे एका हॉटेलच्या खोलीमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. साकीनाका पोलीसांना एका ४८ वर्षीय महिलेचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत सापडला असून या महिलेच्या मृत्यूला ५ दिवसांपेक्षा जास्त काळ झाल्याची माहिती मिळत आहे. नसीमा हलाई असं मृत महिलेचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे, या महिलेचे कुटुंबीय अब्दुल करीम हलाई (८२), तिची २६ वर्षीय मुलगी, तिचा भाऊ आणि पुतण्या हे सगळेजण मृतदेहाजवळ बसून होते. महिलेचा मुलगा यूकेहून परतल्यावर हे प्रकरण उघडकीस आलं आहे. नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घेऊया.
काय आहे नेमकं प्रकरण
नसीमा पतीसोबत भांडण झाल्यानंतर मुलीसह घरातून निघून गेली होती. घरातून बाहेर पडल्यानंतर नसीमा, तिचे वडील, मुलगी, भाऊ आणि पुतण्या वेगवेगळ्या हॉटेलमध्ये थांबले होते. उदरनिर्वाहासाठी नसीमा शिकवणी घ्यायची. अशातच ती आजारी पडली होती. आजारपणाने तिचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर तिच्या पुतण्यानं यूकेमध्ये असलेल्या नसीमाच्या मुलाला ईमेल पाठवला होता. या महिलेचा ५ दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे, अशी माहिती साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गबाजी चिमटे यांनी दिली.
जेव्हा आमची टीमने हॉटेलच्या खोलीत पोहोचली तेव्हा दुर्गंधी येत होती. आम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांचे जबाब नोंदवले आहेत. यात काहीही संशयास्पद आढळलं नाही, असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. तसेच खोलीत कोणत्याही हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यांना परवानगी नव्हती. हॉटेलच्या खोलीत जाऊन मृतदेह बाहेर काढला, तो जवळजवळ कुजलेल्या अवस्थेत होता. आम्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला असून अपघाती मृत्यूची नोंद केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.