डोंबिवली : अडीच वर्षांच्या चिमुरडीची हत्या करत आईनेदेखील आत्महत्या केल्याची घटना रविवारी डोंबिवलीतील हायप्रोफाईल वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रुणवाल सिटीमध्ये घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघींचे मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. मानपाडा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे डोंबिवली शहरात एकच खळबळ उडाली आहे.
डोंबिवली-कल्याण शीळ रोड लगत असलेल्या रुणवाल सिटीत राहुल सकपाळ हे पत्नी पूजा आणि अडीच वर्षांची मुलगी समृद्धीसोबत राहत होते. चार वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. राहुल रविवारी रात्री आठच्या सुमारास कामावरून घरी परत आले असता त्यांना जबरदस्त धक्काच बसला. कारण त्यांची पत्नी पूजाने मुलगी समृद्धीची तोंडावर उशी दाबून हत्या केली. नंतर पूजाने स्वतःदेखील आत्महत्या केल्याचे दिसून आले.
पत्नी पूजा हिने असे का केले ? एक हत्या आणि दुसरी आत्महत्या करण्याचे कारण तरी काय होते ? याचा उलगडा अद्याप झालेला नाही. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.