नवी मुंबई: भांडण करणाऱ्या महिलांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी एका महिलेने २० वर्षीय भाचीवर बीयरच्या बाटलीने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री तुर्भे नाका येथे घडली. नुरी तौफीक शेख असे या आरोपी महिलेचे नाव असून या घटनेनंतर ती फरार झाली आहे. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी तिच्याविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तिचा शोध सुरू केला आहे. या महिलेच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भाचीवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेतील जखमी तरुणीचे नाव तमन्ना सोराब शेख (२०) असे असून ती तुर्भे नाका येथे आरोपी आत्या नुरी तौफीक शेख हिच्यासह आजी रजीया शेख, आत्या पिंकी बाबू शेख हिच्यासोबत राहते. तमन्नाची आजी व तिच्या दोन्ही आत्या तुर्भे नाका येथील ब्रिजवर कांदा-बटाटा विक्री करुन आपला उदरनिर्वाह चालवतात. रविवारी सायंकाळी तुर्भे नाका येथील ब्रिजवर तमन्ना आपली आत्या नुरी शेख हिच्यासोबत कांदा-बटाटा विक्री करण्यासाठी बसली होती. त्यावेळी नुरी शेख हिचा बाजूलाच कांदाविक्री करणाऱ्या ज्युली आजीम शहा तसेच कापडविक्रेत्या सबिना सय्यद शेख व मुस्कान सय्यद शेख या घटनेतील जग्वमी तरुणीने यांच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद झाला.
नुरी शेख हिला शेजारील विक्रेत्या महिलांचा भयंकर राग आल्याने तिने रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास तमन्नाला ठार मारून तिची हत्या ज्युली, सबिना व मुस्कान यांनी केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. अशा प्रकारे नुरीने या तिघांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची योजना आखली होती. ही माहिती देऊनच तिने तमन्नाच्या डोक्यात बीयरची बाटली फोडली आणि त्यानंतर रक्तबंबाळ तमन्नाच्या गळ्यात अर्धवट फुटलेली बीयरची बाटली घुसवली. या हल्ल्यात तमन्ना गंभीर जखमी झाल्याने तिला वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.