मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच विधानसभा निवडणूक आणि उमेदवारी निश्चित करण्यासाठी गुरुवारी मातोश्रीवर बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला ठाकरे गटाचे आमदार, पदाधिकारी आणि संभाव्य उमेदवार यांची उपस्थिती होती. परंतु यावेळी मात्र एक वेगळाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, या बैठकीमध्ये आमदार आणि पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीसाठी एबी फॉर्म देण्यात येणार होते. मात्र ऐनवेळी या उमेदवारांनी एबी फॉर्म न घेता मातोश्रीवरून काढता पाय घेतला असल्याचे समोर आले आहे. .’आम्ही नंतर एबी फॉर्म घेऊ’ असं सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे.
गुरुवारी मातोश्रीवर झालेली बैठक उद्धव ठाकरे यांच्याऐवजी आदित्य ठाकरे यांनी घेतली. उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असल्याकारणाने त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे बैठकीला न येता आदित्य ठाकरे यांनी ही बैठक घेतली.
ज्यांना एबी फॉर्म घ्यायचे आहेत त्यांनी आज घ्या आणि ज्यांना नंतर घ्यायचे आहेत त्यांनी नंतर घ्या, तेव्हा साहेब असतील असं यावेळी सांगण्यात आलं. एबी फॉर्म देण्यात येत होते मात्र आमदार आणि उमेदवारांनी आम्ही नंतर एबी फॉर्म घेऊ असं कळवलं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्रीच आमदार आणि उमेदवारांनी फॉर्म घेतले असते तर शिवसैनिकांमध्ये चुकीचा संदेश गेला असता. उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांच्या अनुपस्थित आपण एबी फॉर्म घेऊन जाणे हे चुकीचं आहे, त्यामुळे शिवसैनिकांमध्ये चुकीचा मेसेज जाईल. म्हणून कोणत्याही आमदार आणि उमेदवाराने एबी फॉर्म घेतला नाही. दोन दिवसात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे उमेदवार एबी फॉर्म स्वीकारतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला यावेळी सुनील प्रभू, सुनील राऊत, रमेश कोरगांवकर, राजन साळवी, संजय पोतनीस, ऋतुजा लटके, कैलास पाटील, शंकरराव गडाख, भास्कर जाधव, वैभव नाईक, नितीन देशमुख, राहुल पाटील या आमदारांची उपस्थिती होती.
तसेच संभाव्य उमेदवारांमध्ये सुधाकर बडगुजर नाशिक पश्चिम, स्नेहल जगताप-महाड मतदारसंघ, अद्वय हिरे – मालेगाव बाह्य, अनिल कदम- निफाड, नितीन सावंत – कर्जत मतदारसंघ, मनोहर भोईर उरण विधानसभा यांची उपस्थिती होती.