मुंबई : अंबानी, अदानी हे उद्योगपती आपल्या देशातच नाहीतर संपूर्व जगभरात प्रसिद्ध आहेत. अदानी समूह जवळपास सर्वच क्षेत्रात आपला व्यवसाय उभा करू पाहत आहे. त्यात आता अदानी समूह वडराज सिमेंट खरेदी करण्याच्या तयारीत आहे. अदानी ग्रुपसह अनेक कंपन्या शर्यतीत आहेत.
वडराज सिमेंटवर एकूण 7 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. कंपनीच्या कर्जदारांमध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युको बँक, येस बँक आणि पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे. अल्ट्राटेक सिमेंटनंतर अदानी समूह हा सर्वात मोठा सिमेंट उत्पादक आहे.
त्याची सिमेंट उत्पादनाची क्षमता 65 दशलक्ष टनांपेक्षा जास्त आहे. अदानी समूहाच्या कंपनीसह सज्जन जिंदाल यांची कंपनी जेएसडब्ल्यू सिमेंट, आर्सेलर मित्तल समूह वडराज सिमेंटच्या खरेदीसाठी इच्छुक आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने ब्युमेर टेक्नॉलॉजी इंडियाची थकबाकी भरण्यासाठी वडराज सिमेंट बंद करण्याचे आदेश 2018 मध्ये दिले होते.
बँकेच्या याचिकेवर 4 सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयाने हा मुद्दा एनसीएलटीकडे वर्ग केला होता. कंपनीच्या कर्जदात्याने दिवाळखोरी प्रक्रियेसाठी पुलकित गुप्ता यांना व्यावसायिक म्हणून नियुक्त करण्याची सूचना केली होती. त्यात आता अदानी समूह वडराज सिमेंट खरेदी करण्याच्या तयारीत असून, लवकरच याची प्रक्रिया पूर्व होईल असे म्हटले जात आहे.