मुंबई : विवाहबाह्य संबंधातून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर फोटो आणि व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका जोडप्याला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुंबईतील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये ही महिला पती आणि मुलीबरोबर राहते.
पोलिसांना दिलेल्या जबाबात तिने म्हटले आहे की, २०१७ मध्ये एक ५४ वर्षीय व्यक्ती पत्नी आणि दोन मुलांसह एकाच मजल्यावर राहण्यास आला होता. २०१९ च्या सुमारास दोघांमध्ये चांगली मैत्री आणि मैत्रीचं रूपांतर नात्यात झालं. आम्ही दोघेजण फोनवर बोलू लागलो. एक दिवस त्या व्यक्तीची बायको आणि मुलं घरी नसताना त्याने मला त्याच्या घरी बोलावले. तेव्हापासून घरी कोणी नसताना, आम्ही दोघे त्यांच्या घरी भेटायचो, असं तक्रारदार महिलेने म्हटले आहे.
१५ जुलै रोजी तक्रारदार महिलेला प्रियकराच्या पत्नीचा फोन आला आणि त्यांच्या नात्याबाबत विचारपूस करू लागली. यानंतर त्याची पत्नी तक्रादार महिलेच्या घरी गेली आणि त्यांचे खासगी फोटो व व्हिडिओ दाखवून धमकावले. तक्रारदार महिलेने दावा केला आहे की, आरोपीने गुपचूप त्यांचे फोटो काढले आहेत. हे फोटो कोणालाही शेअर करू नका, अशी विनंती देखील तक्रारदार महिलेने केली. तरीही हे खासगी फोटो आणि व्हिडिओ त्या व्यक्तीच्या पत्नीने तक्रारदार महिलेच्या नातेवाईकांना पाठवले.
याप्रकरणी तक्रारीत म्हटले आहे की, तिने माझी बदनामी केली आहे. त्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबीयांवर खूप मानसिक आघात झाला. त्यानंतरही मी पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती. परंतु, नंतर ते फोटो आणि व्हिडिओ हे पॉर्न साईट्सवर पोस्ट करण्याची धमकी देण्यात आल्यामुळे महिला घाबरली. परिणामी तिने पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली आहे.