मुंबई: सध्या राज्यात आगामी निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरु केली आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा मुख्य सामना होणार आहे. त्यातच दोन्ही आघाडीमध्ये जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरु आहे. यावरून दोन्ही आघाड्यांमध्ये धुसफूस सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अनेक सर्व्हे आता समोर येऊ लागले आहेत. आलेल्या सर्व सर्व्हेमध्ये उद्धव ठाकरे यांना फटका बसत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याविषयी असलेली सहानभूती आणि जनाधार कमी होत असल्याचे दिसत आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे आहे.
खरं तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले उद्धव ठाकरे हे त्यांच्या संधिसाधू राजकारणामुळे वाढत्या राजकीय आव्हानांना तोंड देत आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीला 161 जागा मिळाल्या. भाजपने 105 आणि शिवसेनेला 56 जागा जिंकल्या. निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीमधून बाहेर पडत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन मुख्यमंत्री बनण्याचा उद्धव यांच्या निर्णयाचा त्यांना फटका बसत असल्याचे दिसत आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्व क्षमतेवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. सरकारी कामकाज प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यात त्यांची असमर्थता आणि संसदीय कार्यपद्धतींबद्दल त्यांना जाण नसल्याची बाब ठळकपणे दिसत होती. मुख्यमंत्रीपदी असताना नियमित आपल्या कार्यालयात न जाणे आणि विधिमंडळात विरोधकांना तोंड देताना ते हतबल झाल्याने त्यांच्या कारभाराबद्दल नाराजी वाढली होती. शिवाय, त्यांच्याच शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद निर्माण होऊन अनेक मंत्री आणि आमदार त्यांच्यापासून दुरावले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीची राजकीय रणनीती
काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी उद्धव यांच्या अगतिकतेचे भांडवल केल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकसभेत उद्धव यांनी त्यांच्या मतदारांना पाठीमागे उभा राहण्याचे आवाहन करूनही त्यांच्या पक्षाला फारसा पाठिंबा मिळाला नाही. मुख्यमंत्रिपद मिळवण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षेने केवळ शिवसेनेच्या भविष्याबाबत तडजोड केली नाही, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ते महाविकास आघाडीमधील कमकुवत बिंदू म्हणून दाखवण्याची संधी दिली. तसेच सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराबाबत उद्धव यांनी घेतलेल्या एकतर्फी निर्णय त्यांच्यावरच उलटला. तिथे काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराने विजय मिळवला, तेव्हा त्यांचे असाह्यपण ठळकपणे समोर आले.
आरोप आणि राजकारणातील भविष्य
अलीकडेच मनोज जरंगे पाटील यांनी एक मोठा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या प्रभावाखाली एका प्रकरणात त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे आघाडीमधील संबंध आणखी ताणले गेले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष उद्धव ठाकरे यांना कमकुवत नेता म्हणून पाहतात. त्यांच्या कमी होत चाललेल्या प्रभावाचा वापर काँग्रेस-राष्ट्रवादी त्यांच्या निवडणूक फायद्यासाठी करत आहेत. ठाकरे यांचा पक्ष आधीच फुटला आहे, लोकांमध्ये त्यांची सहानभूती कमी होत आहे.