मुंबई : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आज ९ जणांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. पण या ९ जणांच्या यादीतलं फहाद अहमद हे नाव पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. फहाद अभिनेत्री स्वरा भास्करचे पती आहेत. त्यांना शरद पवार यांच्या गटाकडून अणुशक्तीनगर येथून तिकीट देण्यात आलं आहे. मागील काही दिवसांपासून फहाद यांच्या नावाची चर्चा सुरु होती.
समाजवादी पक्षाकडून फहाद अहमद हे मुंबईतील अणुशक्तीनगरची जागा लढण्यासाठी इच्छुक होते. फहाद हे समाजवादी पक्षाचे पदाधिकारी होते. मात्र, आता त्यांनी समाजवादी पक्षाला सोडचिठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर अणुशक्तीनगरसाठी त्यांना तिकीट देण्यात आलं आहे. दरम्यान, अनुशक्ती नगरचा सामना हा राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी असा रंगणार आहे. यामध्ये नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक विरूद्ध फहाद अहमद अशी रंजक लढत पाहायला मिळणार आहे.
कोण आहेत फहाद अहमद?
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आलेला फहाद मूळचा उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील आहे. फहादचा जन्म 1992 सालच्या फेब्रुवारीमध्ये झाला. यूपीतील अलिगढ विद्यापीठातून (AMU) फहादनं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी फहाद मुंबईत आले. फहाद हे समाजवादी पक्षाचे पदाधिकारी होते. 2022 साली जुलै महिन्यात त्यांनी आमदार अबू आझमी आणि आमदार रईस शेख यांच्या उपस्थित समाजवादी पार्टीत प्रवेश केला होता.
विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढा
फहाद अहमद हे सामाजिक कार्यात खूप सक्रीय असून विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढा दिलेला आहे. ते समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र युथ विंगचे अध्यक्ष देखील होते. फहाद यांची ओळख एक सक्षम नेतृत्व म्हणून आहे. ज्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. आता येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मुंबईत घेतलं शिक्षण
मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स अर्थात TISS मधून फहादनं MPhil चं शिक्षण घेतलं आहे. TISS मध्ये असतानाच फहादनं विद्यार्थी आंदोलनात सहभाग घेण्यास सुरुवात केली होती. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना फी माफीच्या मुद्द्यासाठी आंदोलन केलं होतं. फहादनं TISS च्या गव्हर्निंग बॉडीचे चेअरपर्सन एस. रामादोराई यांच्या हातून दीक्षांत समारंभात एमफीलची पदवी घेण्यास नकारही दिला होता. फहादनं TISS चा अवमान केल्याचा आरोप करण्यात आला होता.
स्वरा आणि फहादची अशी झाली भेट
2019-2020 मध्ये जेव्हा देशभरात सीएए विरोधी आंदोलनं झालं. त्यावेळी स्वरा भास्करनं स्पष्ट भूमिका घेतली होती, तसेच सीएए विरोधी आंदोलनांमध्ये सहभागी झाली होती. याच आंदोलनात आणि तेथील व्यासपीठावर विद्यार्थी नेता म्हणून फहाद अहमद उपस्थित होता. याच आंदोलनादरम्यान दोघांनी एक सेल्फीही घेतला होता. या आंदोलनांमधील भेटीनंतर दोघांमधील मैत्री वाढत गेली. आणि मैत्रीच रुपांतर प्रेमात झालं. 16 फेब्रुवारी रोजी स्वरा भास्करनं सोशल मीडियावर व्हीडिओ, फोटो शेअर करत, फहाद अहमदसोबत लग्न झाल्याचं जाहीर केलं.