मुंबई : अयोध्येतील भव्य राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारीला होत आहे. मंदिराच्या उद्घाटनासाठी देश तर सज्ज झालाच आहे. मात्र रामलल्लांच्या प्रतिष्ठापणा कार्यक्रमात शंकराचार्य सहभागी होणार नसल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. सोहळा हिंदू धर्मातील शास्त्र, विधींनुसार होत नसून त्याचे उल्लंघन करणारा असल्याचा आक्षेप स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी घेतला आहे. त्यामुळे शंकराचार्यांचे नाव चर्चेत आले आहे. ते का इतके महत्त्वाचे असतात? ते आज आपण जाणून घेऊयात.
शंकराचार्य महत्त्वाचे का असतात?
आद्य शंकराचार्यांनी मठांची स्थापना केली होती. ते हिंदूना दिशा दाखवणारे आणि धर्मगुरु होते. त्यांना जगदगुरु म्हणून देखील ओळखले जाते. शंकराचार्य सनातन धर्माची सुरक्षा आणि धर्माचा प्रसार करु इच्छित होते. त्यासाठी त्यांनी देशातील चार वेगवेगळ्या दिशांमध्ये स्थापन केलेल्या मठांची जबाबदारी त्यांच्या 4 शिष्यांवर सोपवली. या मठांच्या प्रमुखांना शंकराचार्य असे म्हटले जाते. सनातन धर्मात शंकराचार्यांना सर्वोच्च मानले जाते.
सनातन धर्म
सनातन धर्मानुसार, मठात गुरु आपल्या शिष्यांना सतातन धर्माचे शिकवण आणि ज्ञान देतात. हे अध्यात्मिक शिक्षण असते. यात आयुष्यातील महत्वाचे पैलू, समाजाची सेवा आणि साहित्य यांचे ज्ञान दिले जाते. भारतात सध्या द्वारका, ज्योतिष, गोवर्धन आणि श्रृंगेरी असे प्रमुख चार मठ आहेत.
निवड कशी होते?
शंकराचार्य हे संन्यासी, वेदांत ब्राम्हण, ब्रह्मचारी असायला हवे. या शिवाय, संस्कृत, चतुर्वेद आणि पुराण या सर्वांचे ज्ञान असणे महत्वाचे आहे. याशिवाय, त्या व्यक्तीने आपल्या जीवनात मुंडन, पिंडदान केलेले असावे. रुद्राक्ष परिधान करणे महत्वाचे मानले जाते. ब्राम्हण असणे अनिवार्य आहे. विद्वत परिषदेची मान्यताही असायला हवी. त्यानंतर शंकराचार्य ही पदवी मिळते.
देशातील प्रमुख शंकराचार्य
गोवर्धन मठ : ओडिशाच्या पुरी येथे गोवर्धन मठाची स्थापना करण्यात आली होती. गोवर्धन मठाच्या सन्यांश्यांनतर ‘अरण्य’ संप्रदायाचे नाव लावले जाते. निश्चलानंद सरस्वती असे या मठाच्या शंकराचार्यांचे नाव आहे. या मठाअंतर्गत ऋग्वेद आहे.
शारदा मठ : शारदा मठ हा गुजरातमधील द्वारकाधाम येथे आहे. सदानंद सरस्वती हे शारदा मठाचे शंकराचार्य आहेत. या मठाअंतर्गत सामवेद आहे.
ज्योतिर्मठ : उत्तराखंडच्या बद्रिकाश्रम येथे ज्योतिर्मठ आहे. स्वामी अविमुक्तेश्वरानंद या मठाचे शंकराचार्य आहेत. या मठाअंतर्गत अथर्ववेद आहे.
श्रृगेरी मठ : दक्षिण भारतातील रामेश्वरम येथे श्रृंगेरी मठ आहे. जगतगुरु भारती तीर्थ या मठाचे शंकराचार्य आहेत. या मठाअंतर्गत यजुर्वेद आहे.