मुंबई : मुलुंडमधील वसंत गार्डन येथील डोंगराळ भागात असलेल्या धबधब्यावर मजा-मस्ती करण्यासाठी जात असताना १७ वर्षीय मुलाने गुटखा दिला नाही, म्हणून चौघांनी चाकूने सपासप वार करून त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी घडली. मोहम्मद हुसेन ताज हुसैन खान (१७) असे मृत मुलाचे नाव असून, याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून मुलुंड पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगा मोहम्मद हुसेन हा त्याच्या चार मित्रांसोबत वसंत गार्डन येथील डोंगराळ भागात असलेल्या धबधब्यावर मजा-मस्ती करण्यासाठी जात होता. वाटेत त्यांना अनोळखी टोळक्याने अडवून त्यांच्याकडे गुटख्याची मागणी केली. गुटखा नसल्यामुळे या मुलांनी त्यांना नकार दिला.
गुटखा न दिल्याच्या रागातून टोळक्यातील तिघांनी मोहम्मद हुसेन आणि त्याच्या मित्रांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यातील एकाने चाकूचा धाक दाखवून मोहम्मद हुसेनकडील पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केला. मोहम्मद हुसेनने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्याच्या छातीत व पायावर चाकूने सपासप वार करून पळ काढला.
हल्ल्यात गंभीर जखमी होऊन मोहम्मद हुसेन खाली कोसळला. मित्रांनी स्थानिकांच्या मदतीने मोहम्मद हुसेन याला उपचारासाठी तातडीने मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात नेले. मात्र, येथील डॉक्टरांनी त्याला दाखलपूर्व मृत घोषित केले. घटनेची वर्दी मिळताच मुलुंड पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत अपमृत्यूची नोंद करत तपास सुरू केला.
प्राथमिक तपासाअंती पोलिसांनी मोहम्मद हुसेन याचा मित्र अब्दुल हादी अन्सारी (१६) याचा जबाब नोंदवून घेत तीन अनोळखी आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक पोलिसांनी आरोपीना जेरबंद करण्यासाठी विशेष पथके तयार केली असून, गुन्हे शाखेची पथकेसुद्धा आरोपींचा शोध घेत आहेत.