मुंबई : बदलापूरच्या बाल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात संपात व्यक्त केला जात आहे. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. विरोधकांकडून या घटनेचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप सत्ताधारी करत आहेत, तर राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नाही, लाडकी बहीण योजना नको तर सुरक्षीत बहीण योजनेची महाराष्ट्राला गरज असल्याचं विरोधक बोलताना दिसत आहेत. मात्र, सरकार बदलापूर प्रकरणातही योग्य ती कारवाई सुरू असून विशेष एसआयटी नेमण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. त्यातच आता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात एका खटल्याचा संदर्भ दिला, 2 वर्षात आरोपीला फाशीची शिक्षा झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आता, त्या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला प्रश्न विचारले आहेत. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडूनही त्याला प्रत्युत्तर दिलं गेलं आहे.
शिंदे गटातील शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री शिंदेंनी उल्लेख केलेल्या प्रकरणाबद्दल पूर्ण माहिती दिली आहे. सादर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाषणात उल्लेख केलेली घटना ही 2 ऑगस्ट 2022 रोजीची आहे. मावळ येथील बलात्कार आणि हत्या या गुन्ह्याचा हा विषय आहे. याप्रकरणी, मावळ पोलिसांनी एफआयआर दाखल करुन जलद गतीने तपास केला होता.
पुण्यातील ‘ती’ घटना कोणती..?
पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावातील साडेसहा वर्षांच्या बालिकेचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला होता. ही घटना 2 ऑगस्ट 2022 रोजी घडली होती. याप्रकरणी, आरोपी तरुणाला पुण्यातील विशेष न्यायालयाने शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली होती. चौकशीमध्ये आरोपी तेजस दळवीच्या आईचा सुद्धा या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे समोर आले होते. मुलांने केलेल्या कृत्यानंतर गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्यासाठी आईनेच मदत केल्याचे तपासामध्ये उघड झाले होते. त्यामुळे तिला सुद्धा सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. 23 मार्च 2024 रोजी याप्रकरणात पुण्यातील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
Chief Minister @mieknathshinde Ji, in his speech yesterday, highlighted the swift investigation by the Maval Police in the 2022 rape & murder case, which led to a watertight case & conviction.
It’s appalling that those who remain silent on the horrific #Kolkata rape & murder…
— Milind Deora | मिलिंद देवरा ☮️ (@milinddeora) August 22, 2024
नेमका घटनाक्रम काय?
दरम्यान, ती घटना 2 ऑगस्ट 2022 रोजी घडली होती, गुन्हा देखील त्याच दिवशी दाखल करण्यात आला होता. आरोपीला 3 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी 12 सप्टेंबर 2022 रोजी आरोपपत्र दाखल केले होते.या प्रकरणातील तपास 40 दिवसांत पूर्ण करण्यात आला होता. चार्जशीट दाखल केल्यानंतर 6 महिन्यात चार्ज फ्रेम करण्यात आले. 16 मार्च 2023 रोजी चार्जशीट फ्रेम केले आणि 12 मे 2023 रोजी पुरावे कोर्टात सादर करण्यात आले होते. त्यानंतर, 22 मार्च 2024 रोजी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
मुख्यमंत्री शिंदेंनी कालच्या भाषणात उल्लेख केलली घटना हीच असल्याचं खासदार मिलिंद देवरा यांनी ट्विटरवरुन स्पष्ट केलं होतं. तसेच, बदलापूर प्रकरणातही मुख्यमंत्री स्वत: लक्ष देऊन आहेत, असेही देवरा यांनी सांगितलं आहे.