मुंबई : शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी तुळजापूर येथे झालेल्या सभेत पुन्हा एकदा अमित शाह यांच्याकडून अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला गेल्याचा दावा केला. तुळजाभवानी मातेची शपथ घेऊन सांगतो की, अमित शाह यांनी मातोश्रीवर बंद दाराआड अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता, या वाक्याचा पुनरोच्चार त्यांनी केला. आता भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. त्यादिवशी मातोश्रीवर काय घडले, याचे वर्णनच दानवे यांनी केले.
रावसाहेब दानवेंचा दावा काय?
नाशिक येथे पत्रकारांना माहिती देताना दानवे म्हणाले की, जागावाटपाची चर्चा झाली, त्यावेळी मी भाजपाचा प्रदेशाध्यक्ष होतो. त्या चर्चेसाठी अमित शाह यांच्यासह मी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील मातोश्रीवर गेलो होतो. शिवसेनेचेही काही पदाधिकारी चर्चेसाठी त्याठिकाणी आले होते. मातोश्रीवर चर्चा आणि चहापाणी झाल्यानंतर उद्धव ठाकरे सहजपणे अमित शाह यांना म्हणाले की, आपण जरा आत बसू. ते आत गेले आणि २० मिनिटे चर्चा केली. त्यानंतर बाहेर आल्यावर ते एवढेच म्हणाले की, आमचं ठरलं आहे. आपण आता पत्रकार परिषद घेऊ. पत्रकार परिषदेत कुणी किती जागा लढवायच्या, तसेच लोकसभा आणि विधानसभेत आमची युती राहणार एवढेच बोलायचे ठरले होते.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपाच्या सर्वच नेत्यांनी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री राहतील, असे विधान केले. पण कोणत्याही शिवसेनेच्या नेत्याने त्यावेळी आक्षेप घेतला नाही. स्वतः उद्धव ठाकरे यांनीही कधी याबाबत वाच्यता केली नाही. पण २०१९ चा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांच्याशिवाय सरकार बनणार नाही, असे चित्र दिसले, तेव्हा दुपारी २ नंतर उद्धव ठाकरेंची भाषा अचानक बदलली. उद्धव ठाकरेंनी असंगाशी संग करून दगाफटका केला, असा आरोप रावसाहेब दानवे यांनी केला.
दरम्यान, दानवे यांनी या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. महायुतीमधील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला एकेरी आकड्यात जागा दिल्या जातील, अशा चर्चा असल्याची शक्यता रावसाहेब दानवे यांनी फेटाळून लावली. या बातम्या निराधार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाच्या कोणत्या जबाबदार नेत्याने एक आकडी जागा देऊ, असे म्हटलेले नाही. आमची एकत्रित बैठक झाल्यानंतर सन्मानपूर्वक जागावाटप केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.