Weather Updates : मुंबई : मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज पावसाच्या तुरळक सरी बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. ज्यामुळं होती नव्हती ती थंडीसुद्धा राज्यातली आता कमी होणार आहे. पावसाळी ढगांचं सावट मुंबईपासून नवी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड पट्ट्यावर पाहायला मिळणार आहे.
सध्याच्या घडीला महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. हिवाळ्याचा ऋतू देशातील बहुतांश राज्यांवर पकड घट्ट करतो, असं नेहमीच चित्र असत. मात्र, यंदाच्या काळात एक वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. मंगळवारी साताऱ्यामध्येही पावसानं चांगलीच हजेरी लावली. परिणामी येथील डोंगराळ भागामध्ये धुक्याची चादर पाहायला मिळाली. सध्या पाचगणी, महाबळेश्वर आणि खुद्द साताऱ्यामध्ये गारठा वाढला आहे. पावसाची रिमझिमही अधूनमधून पाहायला मिळत आहे.
रत्नागिरीला तडाखा
सोमवारी मध्यरात्रीनंतर इथं पावसानं जोरदार हजेरी लावली. सोसाट्याचा वारा आणि पावसाचा मारा यामुळं रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर, राजापूर, चिपळून भागांना तडाखा बसला. अनेक भागांमध्ये काजू- आंब्याचं नुकसान झालं, तर सुपारी आणि नारळाच्या बागांनाही या पावसाचा फटका बसला. मागील दोन दिवसांपासून रत्नागिरीमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. शिवाय इथं तापमानातही काही अंशांची वाढ नोंदवण्यात आली.
काय आहे हवामानाचा अंदाज?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 48 तासांत उत्तर महाराष्ट्र, विदर्भात थंडी वाढेल, तर मध्य महाराष्ट्र, कोकण पट्ट्याला पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. कारण, गुजरातच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तर, पश्चिमी झंझावात अर्थात एक थंड हवेचा प्रवाह हरियाणामध्ये सक्रीय आहे. परिणामी आग्नेयकडून बाष्पयुक्त वारे राज्यात येत असल्यामुळं हे पावसाळी वातावरण तयार झालं आहे.