मुंबई : मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भांडुपमध्ये एका जीम ट्रेनरने सुरक्षा रक्षकाला दारूच्या नशेत केलेल्या मारहाणीत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवाजी दत्तू बारवे असे मयत सुरक्षा रक्षकाचे नाव असून ते 60 वर्षाचे होते. भांडुप पश्चिम येथे ड्रिंम्स सोसायटीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून ते नोकरीला होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ड्रीम्स सोसायटीमध्ये एक जिम असून या जिममध्ये विशाल गावडे हा जिम ट्रेनर म्हणून दोन वर्षांपूर्वी काम करत होता. मात्र काही कारणास्तव त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. तो सोमवारी रात्री सोसायटीमध्ये आला मात्र तो दारूच्या नशेत असल्याने त्याला बारवे यांनी अडवले. त्याचा राग मनात धरून विशाल तावडे याने हा शिवाजी बारवे यांना शिवीगाळ करून मारहाण केली.
जिम ट्रेनरला अटक केली..
दारू पिलेला असल्याने विशाल गावडे याने काहीही विचार न करता सुरक्षारक्षक असलेल्या शिवाजी यांचे डोकं भिंतीवर तीन ते चार वेळा जोरात आपटले. त्यानंतर शिवाजी यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. या सर्व मारहाणी मध्ये गंभीर जखमी झालेल्या शिवाजी बारवे यांना त्यांच्या सहकार्याने केईएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.या प्रकरणी भांडुप पोलिसांनी जिम ट्रेनरला अटक केली आहे.