मुंबई : राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक आज पार पडणार आहे. विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी तब्बल बारा उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या सर्व उमेदवारांसाठी आज शुक्रवारी 12 जुलै रोजी मतदान पार पडत असल्याने सर्वांचेच लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. विधानपरिषदेसाठी जागा 11 आहेत, पण उमेदवार 12 असल्याने एका उमेदवाराचा पराभव होणार हे निश्चित आहे. विधानपरिषद निवडणुकीला अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना पराभूत होणारा तो बारावा उमेदवार कोण? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या रुपात 12 वा उमेदवार दिल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. याचा फटका सत्ताधारी गटाला बसणार की विरोधकांना हे काहीच तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. 12 वा उमेदवार देऊन, उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर बंदूक ठेऊन शरद पवारांनी अजित पवारांना खिंडीत गाठण्याचं राजकारण केल्याचीही जोरदार चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे महायुतीचे सर्व 9 उमेदवार निवडून येण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सूत्रं हाती घेतल्याचे दिसत आहे.
क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी खबरदारी
विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी सर्वच पक्षांनी खबरदारी घेतली आपपल्या आमदारांना विविध हॉटेलमध्ये ठेवले आहे. या सर्व आमदारांना मतदान कसं करायचं, कोणत्या पद्धतीने करायचे याबद्दलच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विधानपरिषदेसाठी किती उमेदवार रिंगणात?
विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीचे 9, तर महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये भाजपचे 5, तर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांनी प्रत्येकी 2 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर दुसरीकडे महाविकासआघाडीच्या काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात आहे. तर शरद पवार गटाने भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांना पाठिंबा दर्शविला आहे.
‘हे’ उमेदवार रिंगणात
भाजप :
पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित बोरखे, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत
शिवसेना (एकनाथ शिंदे ) :
भावना गवळी, कृपाल तुमणे
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) :
राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे
काँग्रेस :
डॉ. प्रज्ञा राजीव सातव
शेतकरी कामगार पक्ष :
जयंत पाटील
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) :
मिलिंद नार्वेकर