Pune Prime News : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची आणि घड्याळ चिन्ह कोणाचे याचा निर्णय देतानाच शरद पवार गटाला राज्यसभा निवडणुकीसाठी पक्षाचे नाव आणि चिन्ह सुचविण्यास सांगितले होते. यानंतर शरद पवार गटाने काही पर्याय दिले होते. यापैकी एक नाव शरद पवार यांच्या पक्षाला देण्यात आले आहे.
तर शरद पवार यांच्या राजकीय पक्षाने पक्षाचे चिन्ह म्हणून चार वेगवेगळे पर्याय दिले आहेत. त्यापैकी एक वटवृक्ष असले तरी हे चिन्ह आमचे असल्याने ते देऊ नये असा विरोध विश्व हिंदू परिषदेने निवडणूक आयोगाकडे नोंदविला आहे. यामुळे पवार गटाची कोंडी होण्याची शक्यता आहे.
शरद पवार वटवृक्ष चिन्हासाठी आग्रही
शरद पवारांना वटवृक्ष हे चिन्ह हवे आहे. मात्र, अद्याप पक्षचिन्ह ठरलेले नाही. राज्यसभा निवडणुकीला पक्षचिन्ह लागणार नसल्याने शरद पवार गटाने त्याचे प्रस्ताव दिले नसल्याचे सांगितलं जात असले तरी पवार हे वटवृक्ष चिन्ह मिळावे यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. परंतु या चिन्हाला विश्व हिंदू परिषदेने विरोध केला आहे.
तर दोन चिन्हांपैकी एक दिले जाण्याची शक्यता
वटवृक्ष हे चिन्ह विश्व हिंदू परिषद संघटनेचे अधिकृत चिन्ह असून ते नोंदणीकृत असल्याचे म्हटले आहे. यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला देण्यास विश्व हिंदू परिषदेने आक्षेप घेतला आहे. यामुळे आता निवडणूक आयोग कोणता निर्णय घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे शरद पवारांनी उगवता सूर्य आणि काचेचा ग्लास अशा चिन्हांचा प्रस्ताव दिल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.
जर ही चिन्हे मागितली असतील तर वटवृक्षाचा पर्याय उपलब्ध नसल्यास या दोन चिन्हांपैकी एक दिले जाण्याची शक्यता आहे. विहिंप देखील निवडणुका लढवत असते. प्रविण तोगडिया हे देखील अनेकदा निवडणूक लढवत असतात. यामुळे विहिंपने हे चिन्ह शरद पवारांना देण्यास आक्षेप घेतला आहे.