मुंबई : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी नालासोपारा मतदारसंघात पाच कोटी रुपये वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार सामोर आला आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी विनोद तावडे आणि विरारचे भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्याविरोधात तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर विरारमधील एका हॉटेलमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं.
नेमकं काय घडलं?
विरार पूर्वच्या विवांता हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत असताना बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये आले. त्यांनी थेट विनोद तावडेंवर प्रश्नांची सरबत्ती केली. काही काळ तावडे आणि बविआ कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. दरम्यानच्या काळात पोलिसांनी मध्यस्थी करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, विनोद तावडे यांच्या शेजारील टेबलवर बविआ कार्यकर्त्यांच्या हातात काळ्या रंगाची बॅग लागली. त्या पाकिटातून नोटांची बंडलं बाहेर आल्यानंतर तर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरूवात केली. या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना प्रश्न विचारत थेट 4 तास हॉटेलमध्येच रोखून धरलं.
दरम्यान या सर्व प्रकारानंतर काही वेळातच निवडणूक आयोगाची टीम तिथे पोचली. त्या ठिकाणी एसएसटी टीमला 9 लाख 93 हजार पाचशे रुपये हाती लागले. त्याचबरोबर इतर कागदपत्रे देखील त्या ठिकाणी सापडले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू असून पोलिसांनीसुद्धा तक्रार दाखल केली असून या हॉटेलची पूर्ण तपासणी करून त्याबाबतीत पूर्ण कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी दिली आहे.