वसई : अर्नाळा राजोडी रस्त्यावर चारचाकी वाहनाच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी (दि.25) संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. नवशी बसवंत (६५) असे मृत माहिलेचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी चालक कुलदीप मिश्रा याला पोलिसांनी अटक केली आहे.
शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास अर्नाळा राजोडी-सत्पाळा या रस्त्यावरून नवशी बसवंत (६५) आणि मथुरा दयात दोघी चालत निघाल्या होत्या. याच दरम्यान हा अपघात झाला. या अपघातात भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी स्कॉर्पिओने बसवंत यांना धडक दिली. यात बसवंत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या संतप्त जमावाने चालकाला मारहाण करत गाडीची तोडफोड केली. पोलिसांना या अपघाताची माहिती होता. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जमावाला शांत करून चालकाला ताब्यात घेण्यात आले. महिलेचा मृतदेह अर्नाळा पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेऊन विरारच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.
या प्रकरणी चालक कुलदीप मिश्रा याला अटक केली असून त्याप्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले आहे. याचा पुढील तपास ही सुरू आहे असेही पाटील यांनी सांगितले आहे. मृत महिला नवशी या सत्पाळा नाका ग्रामपंचायत कार्यालयामागे राहत होत्या. मुळच्या त्या डहाणू तालुक्यातील मुरबाड पोस्ट वैती येथील होत्या. वेठबिगारी मजूर म्हणून काम करण्यासाठी त्या वसईत आल्या होत्या. त्यानंतर इथेच वास्तव्याला राहिल्या.