मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रीय निवडणुक आयोगाकडे नव्या चिन्हाची यादी सादर केली आहे. आंबेडकर यांनी नवी दिल्लीमध्ये आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची भेट घेतली. त्यावेळी ही यादी त्यांच्याकडून सादर करण्यात आली. आगामी एक ते दोन दिवसांमध्ये वंचित बहुजन आघाडीला नवे निवडणूक चिन्ह मिळण्याची शक्यता आहे.
नुकत्याच झालेल्या भारत जोडो न्याय यात्रेच्या मुंबईतील सभेमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी जनसमुदायाला संबोधित केले होते. राज्यातील एकूण 48 जागांपैकी प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघडीसाठी किमान 6 जागांची मागणी केली होती. मात्र, जागावाटपमध्ये वंचितला केवळ चार जागा देण्यात येतील, असे महाविकास आघाडीकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, चार जागांचा प्रस्ताव वंचितने अमान्य केला
वंचित बहुजन आघाडीला आपले उमेदवार उभे करण्यासाठी निवडणूक चिन्ह आवश्यक आहे. त्यासाठी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आबेडकर यांनी आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला गॅस सिलेंडर, शिट्टी आणि रोडरोलर या चिन्हांची यादी निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केली. यानंतर निवडणूक आयोग या चिन्हावर एक ते दोन दिवसांमध्ये निर्णय घेण्याची शक्यता आहे. तर, वंचित बहुजन आघाडीचा नेत्यांसह कार्यकर्त्यांना वरीलपैकी कोणते चिन्ह मिळते, याची उत्सुकता लागली आहे.