मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीनं दुसरी यादी जाहीर केली आहे. वंचितने पहिल्या यादीमधून 8 उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर आता आज दुसऱ्या यादीमधून 11 उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी मविआपासून दूर झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
पहिल्या यादीत पूर्व विदर्भातील मतदारसंघाचा समावेश होता तर दुसऱ्या यादीत वंचितनं मराठवाडा, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. दुसऱ्या यादीत विविध जातीधर्मातील लोकांना स्थान देण्यात आले आहे. 2 बौद्ध उमेदवारांचा देखील समावेश आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राहुल गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ते बौद्ध समाजातून येतात. या लोकसभा मतदारसंघातून बौद्ध मतदारांची संख्याही मोठी आहे. त्यामुळेच वंचितने राहुल गायकवाड यांना मैदानात उतरवले आहे. तसेच माढा लोकसभा मतदारसंघातून रमेश बारस्कर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बारस्कर हे लिंगायत माळी समाजातील आहेत.
म्हणून मागील लोकसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला
गेल्या लोकसभा निवडणुकीत आमच्या 8 जागा या काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे पडल्या, हिंदू मते मिळाली पण मुस्लीम मते काँग्रेस राष्ट्रवादीने विभागली त्यामुळे आमचा पराभव झाला. जर ही मते आम्हाला मिळाली असती तर आम्हाला 8 जागा जिंकत्या आल्या असत्या असा आरोप वंचितबहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी नागपूरच्या पत्रकार परिषदेत केला आहे .
वंचित बहुजन आघाडीची दुसरी यादी जाहीर
हिंगोली – डॉ. बी.डी चव्हाण
लातूर – नरसिंहराव उदगीरकर
सोलापूर – राहुल काशिनाथ गायकवाड
माढा – रमेश बारस्कर
सातारा – मारुती धोंडीराम जानकर
धुळे – अब्दुल रहेमान
हातकणंगले – दादासाहेब चवगौंडा पाटील
रावेर – संजय पंडित ब्राम्हणे
जालना – प्रभाकर बकले
मुंबई उत्तर मध्य – अब्दुल हसन खान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – काका जोशी