मुंबई: वंचित बहुजन आघाडीच्या एका अनधिकृत कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेने पाडकामाची कारवाई केली आहे. यानंतर पक्षाचे कार्यकर्ते चांगलेच झाले आहेत. कार्यकर्त्यांनी कुर्ला रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता अडवला आहे. याठिकाणी गेल्या काही तासांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची संख्या वाढत असल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे.
१५ फेब्रुवारी रोजी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडून कुर्ला चुनाभट्टी येथे असलेले वंचितचे कार्यालय तोडण्यात आले होते. या विरोधात गुरुवारी वंचितच्या कार्यकर्त्यांनी पालिकेच्या एल विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडत आंदोलनाला सुरुवात केली. कुर्ला रेल्वे स्टेशनकडे जाणारा रास्ता अडवला होता. कार्यकर्ते इतके आक्रमक झाले होते की, त्यांनी पालिका कार्यालयाचे प्रवेशद्वार ही तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीमध्ये काही वंचितचे कार्यकर्ते जखमी देखील झाले आहेत. जोपर्यंत पालिका पुन्हा आमचे कार्यालय उभे करुन देत नाही, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी शांत राहणार नाही. तसेच पाडकामाची कारवाई केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी. ही कारवाई राजकीय हेतूने करण्यात आल्याचा आरोप ही वंचितने केला.
सकाळी वंचितच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केल्यानंतर पोलिसांनी त्यांना पांगवले होते. मात्र, थोड्यावेळानंतर वंचितचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुन्हा कुर्ला रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता रोखून धरला आहे. या आंदोलनाची माहिती कळताच मुंबईच्या इतर भागातून वंचितचे कार्यकर्ते कुर्ला परिसरात दाखल झाले. कार्यकर्त्यांची संख्या वाढल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी राखीव पोलीस दलाची अतिरिक्त फौजफाटा मागवून घेतला आहे. पोलिसांनी बळाचा वापर करत वंचितच्या कार्यकर्त्यांना रस्त्याच्या एका बाजूला मागे ढकलले. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक काहीप्रमाणात सुरु होण्यास मदत झाली. परंतु, रस्त्याची एक बाजू अजूनही वंचितच्या कार्यकर्त्यांनी रोखू धरली आहे. आता अतिरिक्त फौजफाटा आल्यानंतर पोलीस वंचितच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.