मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षातील नेत्यांची जोरदार तयारी सुरु आहे. अशातच आज आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे २७ जागांचा प्रस्ताव सादर केला आहे. वंचित बहुजन आघाडीने एकूण २७ जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच अकोला, जालना आणि पुणे या ३ लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही आहेत.
ठाकरे गट २० जागांवर ठाम
महाविकास आघाडीतील आतापर्यंत झालेल्या चर्चेत घटक पक्षाच्या वाट्याला संभाव्य जागांवर वंचितने दावा केला आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या ७ जागा, काँग्रेसच्या ९ जागा तर राष्ट्रवादी पवार गटाच्या ५ जागांचा आणि तिढा असलेल्या ५ जागांवर वंचितने मागणी केली आहे. तर ४८ पैकी शिवसेना एकूण २० जागांवर निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. तर वंचित बहुजन आघाडी अकोला, जालना आणि पुणे या ३ लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही असल्याचं स्पष्ट झालं आहे.
वंचितकडून २७ जागांचा प्रस्ताव सादर
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर म्हणाले कि, १५ ओबीसींच्या, तर ३ अल्पसंख्याक यांना उमेदवारी द्याव्यात. आम्ही एकूण २७ जागांसाठी प्रस्ताव सादर केला आहे. काही अपवाद वगळता चर्चा करू. आम्हाला महाविकास आघाडीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी पत्र लिहून अनेकदा मागणी केली. घटक पक्षांनी चर्चा करून निर्णय घ्यावा. जागावाटपाबाबत तिढा सोडवण्यासाठी दिल्लीत चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं पुंडकर म्हणाले.