मुंबई : मंत्रालयातून पुन्हा एकदा मोठी बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सुदैवाने मंत्रालयात लावलेल्या संरक्षक जाळीमुळे संबंधित व्यक्तीचा जीव वाचला आहे. आज दुपारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
अरविंद बंगेरा असं त्या व्यक्तीचं नाव आहे. या व्यक्तीची वडापावची गाडी आहे. दरम्यान, या व्यक्तीने मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी का घेतली, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अरविंद बंगेरा हे बोरिवली येथील रहिवासी आहे. त्यांचा वडापावचा व्यवसाय आहे. काही कामानिमित्त ते मंत्रालयात आले होते. मात्र अचानक या व्यक्तीने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. यामुळे परिसरात खळबळ उडाली.
तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर बंगेरा हे पहिल्या मजल्यावरील संरक्षक जाळीवर पडल्याने त्यांचा जीव वाचला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान या व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला याचे नेमके कारण समजू शकले नाही. बंगेरा यांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची अधिक चौकशी सुरू आहे.
View this post on Instagram
…म्हणून वाचले प्राण
काही वर्षांपूर्वी मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून हर्षल रावते या व्याक्तीने उडी मारून आत्महत्या केली होती. त्यानंतर गृह विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेच्या जबाबदारीविषयी बैठक झाली. या बैठकीत मंत्रालयाची सुरक्षा आणि आत्महत्यांचे सत्र रोखण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. या बैठकीनंतर पहिल्या मजल्याला समांतर संरक्षक जाळी बसविण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. या जाळीमुळे यापूर्वीही अनेकांचे प्राण वाचले आहेत.