मुंबई : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात वेगवेगळे निकाल येऊ शकतात. आयाराम-गयाराम थांबवण्यासाठी आणि दहावे परिशिष्ट बळकट करण्यासाठी हा निकाल महत्वाचा असणार आहे. यामध्ये व्हीपचा मुद्या महत्वाचा असणार आहे, असे ज्येष्ठ विधिज्ज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल देणार आहे. त्यावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांचा व्हिप मान्य केला आहे. यामुळे सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांच्या निवडीच्या वेळी जो व्हिप काढला त्यावेळी त्या व्हिपची अवहेलना झाली का ? याचा निकालात समावेश असणार आहे. हा निकाल म्हणजे ‘कुछ खूशी कुछ गम,’असणार, असे उज्ज्वल निकम म्हणाले आहेत.
कुछ खूशी कुछ गम
सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने राज्यातील सत्ताकारणाचा निकाल देताना विधिमंडळाचा पूर्ण आदर राखला. आमदार अपात्र ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे दिला. त्यानंतर अध्यक्षांकडे सुनावणी झाली. व्हिपचा नोटीसमध्ये स्पष्ट उल्लेख आहे का ? हे पाहावे लागणार आहे. कोर्टाने नोंदवलेल्या निरीक्षणाचे अध्यक्ष पालन करणार का ? हे महत्वाचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुनील प्रभू यांचा व्हिप ग्राह्य धरला. परंतु राजकीय पक्ष कोणाकडे होता, हे ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांना दिले. तसेच आमदारांना अपात्र करण्यासंदर्भात भाष्य केले नाही. तो निर्णय अध्यक्षांकडे सोपवला. यामुळे हा निकाल म्हणजे कुछ खूशी कुछ गम, असा असणार आहे, असे उज्ज्वल निकम म्हणाले.