मुंबई : काँग्रेसच्या प्रमुखांकडून अजून जागावाटपाचा कोणताही प्रस्ताव नाही, तर राष्ट्रवादीशी जागावाटपाचं जवळपास निश्चित, तर वंचितबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. पुढे बोलताना म्हणाले अयोध्येत जाण्यासाठी आपल्याला कोणत्याही निमंत्रणाची गरज नाही, 22 जानेवारी हा काही एकमेव अयोध्येत जाण्याचा मुहूर्त नाही, आपण याआधीही दोनदा अयोध्येत गेलेलो आहोत. त्यामुळे आपण कधीही अयोध्येला जाऊ शकतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
पुढे म्हणाले, महाविकास आघाडीतील जागावाटप सुरळीत होईल आणि राष्ट्रवादी आणि आमची बोलणी सुरळीत झालेली आहेत, ज्यावेळी इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक पार पडली, त्यावेळी काँग्रेससोबतही बोलणं झालं. त्यावेळी माझ्यासोबत संजय राऊत होते. मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्याशीही याबाबत सविस्तर बोलणं झालं. त्यामुळे सर्वकाही सुरळीत होणार आहे. इथे जे काही बोललं जात आहे, त्यावर विश्वास ठेवू नका, कारण असा कोणताही निरोप मला त्यांच्याकडून आलेला नाही. असं उद्धव ठाकरे म्हणाले.
माझ्यात आणि इंडिया आघाडीत मी बिघाडी होऊ देणार नाही. मी कोण काय बोलत आहे, याकडे लक्ष देणार नाही, जोपर्यंत काँग्रेस अध्यक्ष किंवा पक्षश्रेष्ठी माझ्याशी याबाबत बोलत नाही, तोपर्यंत मी किंवा माझ्यासोबतचे इतरही याबाबत भाष्य करणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.