मुंबई : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाची शिवसेना ठाकरे गटाकडून मंगळवारी अक्षरश: चिरफाड करण्यात आली. जी घटनादुरुस्ती राहुल नार्वेकर यांच्याकडून नाकारण्यात आली, तीच घटनादुरुस्ती, त्यामधील झालेले ठराव या महापत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे गटाकडून सादर करण्यात आले. यावेळी 2018 मध्ये झालेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांची नेतेपदी निवड करण्यात आली होती. हा पुरावाच यावेळी सादर करण्यात आला. यावेळी शिंदे यांनी नेतेपदी निवड होताच त्यांनी उद्धव ठाकरे यांचे पाय धरल्याचे दिसून येते.
महा पत्रकार परिषदेत यावेळी शिवसेना ठाकरे गटाकडून 2013 मध्ये झालेल्या शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीमधील ठराव सुद्धा सादर करण्यात आले. यावेळी शिवसैनिक म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुद्धा उपस्थित होते. कार्यकारिणीच्या बैठकीतील ठराव सुद्धा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अनिल परब यांनी वाचून दाखवले.