मुंबई: शिवसेना -ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालावरुन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सडकून टीका केली. “पात्र आणि अपात्रतेचा निर्णय आता जनता घेईल. जर जनता म्हटली तर मी घरी बसेल. पण लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही ? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे अस्तित्व आणि त्याचा अधिकार राहील की नाही? हा प्रश्न आहे. त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या चौकटीत निर्णय द्यायचा होता. कोर्ट फाशीची शिक्षा सुनावतं. प्रत्यक्षात अंमलात आणतो जल्लाद. त्या जल्लादाचं काम लवादाला दिलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने सर्व तयार करून दिलं. लवाद म्हणतो मी फाशी कशी देऊ? याचा जन्माचा दाखला नाही. अरे याचा जन्माचा दाखला तपासायला सांगितलं नव्हतं. त्याने जो गुन्हा केला त्याची शिक्षा द्यायला सांगितलं होतं”, असा शब्दांत उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांच्या निकालावर निशाणा साधला.
“निवडणूक आयोग म्हणजे दिव्यच आहे. एखादी व्यक्ती बँकेत पासबुक घेऊन पैसे काढायला गेला तर बँक म्हणते तुमचं खातच नाही. अहो पास बुक आहे, चेक आहे. मग खातं कसं नाही? खातं गिळलं का तुम्ही? गिळून बसलात. हा केवढा मोठा कट आहे. त्या कटाचं मूळ सर्वांना माहीत आहे”, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
“शिवसेनेने सर्व पेपर नीट दिले. काय काढायचं ते काढून देतो. समजा आम्ही दिलेली १९९९ साली दिलेली घटना अंतिम मानली तर २०१४ ला मला काय म्हणून मोदींना पाठिंबा देण्यासाठी बोलावलं होतं? कशासाठी माझी सही घेतली? कोण तरी ढोकळावाला किंवा शेवफाफड्या वाल्याची घ्यायची होती. मला कशाला बोलावलं होतं. तुम्हाला माहीत असेल, २०१९साली जी रांग बसली होती, त्यात मी बसलो होतो. त्यावेळी मोदी म्हणाले होते, अब बालासाहेब नही रहे, मुझे सलाह मशवरा करना हो तो उद्धव ठाकरे से बात करता हूँ, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.