मुंबई: राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत पोहोचली असून शिवाजी पार्कवर जाहीर सभेने तिची सांगता होत आहे. या सभेसाठी इंडिया आघाडीचे मोठे नेते उपस्थित या सभेत उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजपने भारताची घटना बदलण्यासाठी चारशेचा पारचा नारा दिला आहे. चारशे पार म्हणायला ते काय फर्निचरचं दुकान वाटलं का? ‘अब की बार भाजप तडीपार’ म्हणत हुकूमशाहीचा अंत करा, असे आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केले.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, महात्मा गांधीजींनी 1942 ला मुंबईमध्येच इंग्रजांना चले जावं, असे सांगितलले होते. दिल्लीमध्ये असलेली हुकूमशाही आपली लोकशाही मारण्यासाठी टपलेली आहे. तिला तडीपार करण्यासाठी राहुल गांधी यांनी शिवाजी पार्क निवडले, त्याच्याबद्दल मी तुम्हाला खास धन्यवाद देतो. खरं पाहिलं तर हा भाजप एक फुगा आहे आणि मला वाईट एका गोष्टीचं वाटतं की, या फुग्यामध्ये हवा भरण्याचे काम आम्हीच केले. एकेकाळी संपूर्ण देशात त्यांचे दोन खासदार होते. आता त्यांच्या डोक्यामध्ये हवा गेली आहे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.