मुंबई: वापरा आणि फेकून द्या, हे भारतीय जनता पक्षाचे नवीन धोरण आहे. ते आम्हाला वारंवार नकली सेना, नकली पुत्र म्हणत आहेत. काही दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी नकली आरएसएस देखील म्हणतील. आज एका वृत्तपत्रात बातमी आली आहे की, आता भारतीय जनता पक्षाला आरएसएसची गरज नाही. याचा सरळ अर्थ असं की, आता संघाला धोका आहे. आपल्याकडे सोळावं वरीस धोक्याचं म्हणतात, तसं संघाला शंभर वरीस धोक्याचं होणार असल्याची खरपूस टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
महाविकास आघाडी आणि शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा दादरमध्ये पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी राज ठाकरे यांचा भाडोत्री ठाकरे असा उल्लेख केला. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना निवांत झोप लागो, या शुभेच्छा देतो. चार जूननंतर त्यांना आपण इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीला बोलावणार आहोत, असा जोरदार टोलाही ठाकरे यांनी लगावला.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, माजी खासदार अनिल देसाई यांचे राज्यसभेतील व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील आणि समोरच्या उमेदवाराचेही व्हिडीओ तुमच्याकडे आले असतील. मग मला एक सांगा, तुम्हाला रेवण्णासारखा खासदार पाहिजे की अनिल देसाई सारखा पाहिजे? गद्दार, चारित्र्यहिन, भ्रष्टाचारी जमवले, तरी भारतीय जनता पक्षाला काही पुरत नाही. त्यामुळे इकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे असल्याने तिकडे एक ठाकरे नावाचा माणूस हवा म्हणून एक भाड्याने घेतला आहे. दुपारी उठून आता सुपारी चघळत बसले असतील, असा जोरदार हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की, सध्या मी काहीही बोललो तरी लगेच अर्थाचा अनर्थ केला जातो. मी माझ्या भाषणाची सुरुवात कशी करतो, यावरून देवेंद्र फडणवीस शुक्रवारी बोलले. अरे, मी भारतीय जनता पक्षाला लाथ घातली आहे, हिंदुत्व कसे सोडेन? माझ्या देशभक्तीवर त्यांच्याकडून सारखे प्रश्न उपस्थित केला जात आहेत. मी देशभक्त आहे, परंतु, अंधभक्त नाही. तसेच पंतप्रधान मोदी मुंबईला भिकारी करू पाहत आहेत, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.