मुंबई: दिवाळी संपताच शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभांचा नारळ मंगळवारी (दि.५) फुटणार आहे. कोकणातील रत्नागिरी आणि राजापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या प्रचारसभांना सुरुवात होणार असून, पहिल्या टप्प्यात ८ मतदारसंघांत त्यांच्या प्रचाराच्या तोफा धडाडतील.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २९ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत होती. ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर राज्यातील उमेदवारांच्या लढतीचे चित्र स्पष्ट होईल. त्याचा विचार करूनच ठाकरे यांच्या प्रचारसभांचे नियोजन केलेले दिसते. तब्येतीमुळे ठाकरे प्रचारसभांमध्ये भाग घेणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह होते. प्रचार दौऱ्याच्या या पहिल्या टप्प्यामुळे त्याबाबतची शंका मिटली आहे.
ठाकरे यांच्या सभा
- ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता रत्नागिरी व राजापूर विधानसभा.
- ६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता भिवंडी ग्रामीण विधानसभा.
- ७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता दर्यापूर विधानसभा.
- ७ नाव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता बडनेरा विधानसभा.
- ८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता बुलढाणा विधानसभा.
- ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मेहकर विधानसभा.
- ८ नाव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता परतूर विधानसभा.
बुधवारी महाविकास आघाडीची जाहीर सभा
महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांनी आपल्या प्रचार दौऱ्याची आखणी केली असली, तरी महाविकास आघाडीच्या संयुक्त प्रचार सभेची सुरुवात बुधवार, ६ नोव्हेंबरपासून होणार आहे. वांद्रे- कुर्ला संकुलात होणाऱ्या जाहीर सभेला राज्यभरातून कार्यकर्त येणार असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सभेला मार्गदर्शन करणार आहेत.