मुंबई : मराठा आरक्षणावरून उदयनराजेंचा सरकारला घरचा आहेर दिला आहे. जास्त दिवस घोंगड भिजत ठेवलं तर ते वास मारतच आणि जास्त दिवस एखद्याकडे दुर्लक्ष केलं तर चीड येणारच असं म्हणत भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारची कानउघडणी केली आहे. मनोज जरांगे पाटील 20 जानेवारी रोजी पायी दिंडीने मुंबईच्या दिशेने कूच करतील. पण त्याआधी उदयनराजे भोसले यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.
मराठा आरक्षणावरून सरकारला बोलताना त्यांनी शरद पवारांना देखील टोला लगावला. त्यावेळेस जर मंडल आयोगाच्या बाबतीत सगळं केलं असतं तर आज हा विषयच राहिल नसता, असं म्हणत उदयनराजेंनी शरद पवारांवर टीका केली. इतर राज्यांप्रमाणे राज्यातील आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी देखील उदयनराजेंनी केली. राज्यातील आरक्षण मर्यादा वाढवली तर सहज प्रश्न सुटेल. आरक्षण मर्यादा 70 ते 72 टक्के करा, हाच पर्याय असल्याचे उदयनराजे यांनी म्हटले आहे.
मागील अनेक महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाने सुरुवात केली आहे. त्यातच आता मनोज जरांगे यांनी 20 जानेवारी रोजी मुंबईकडे कूच करणार असल्याची घोषणा केलीय. त्यामुळे आता मुंबईत मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन हे सुरु होणार आहे. ओबीसीतूनच मराठा आरक्षण मिळावं अशी मागणी मराठा समाजाकडून केली जातेय. तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेऊ देणार नाही, अशी भूमिका राज्यातील ओबीसी नेत्यांनी घेतली आहे.