मुंबई: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय असलेले सूरज चव्हाण यांना कथि खिचडी घोटाळ्याप्रकणी 22 जानेवरीपर्यंत ईडीची कोठडी देण्यात आली आहे. ईडीने सूरज चव्हाण यांची 8 दिवसांची कोठडी मागितली होती. दरम्यान 17 जानेवारी रोजी ईडीकडून सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली होती.
खिचडी घोटाळा नेमका आहे तरी काय?
कोरोना काळात स्थलांतर करणाऱ्या गरीब कामगारांसाठी आणि ज्यांचे मुंबईत घर नाही, अशा कामगारांसाठी लॉकडाऊनच्या काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. केंद्र सरकारकडूनही त्याला पाठिंबा देण्यात आला होता. मुंबई महापालिकेकडून एकूण 52 कंपन्यांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. सुरुवातीच्या चार महिन्यांच्या कालावधीत चार कोटी खिचडी पॅकेट्स वाटण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली. या कामात घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या सूरज चव्हाण यांचे नाव यामध्ये घेण्यात आले होते.
दरम्यान कथित खिचडी घोटाळा प्रकरणात सूरज चव्हाण आणि अमोल किर्तीकर यांची आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली. अमोल किर्तीकर यांच्या खात्यात 52 लाख तर सूरज चव्हाण यांच्या खात्यात 37 लाख रुपये जमा झाल्याचे त्यावेळी समोर आले. चौकशी दरम्यान या दोघांनाही त्यांच्या खात्यात जमा झालेल्या रक्कमेबाबत विचारणा झाली. त्यानंतर चौकशीत या दोघांनी आपण, फोर्सवन या कंपनीचे कर्मचारी असल्यानं त्यांना पगार म्हणून हे पैसे मिळाले असल्याचं सांगितलं. दोघेही सल्लागार म्हणून या कंपनीसाठी काम करत असल्याचा जबाबत उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे. सूरज चव्हाण आणि अमोल किर्तीकर या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेनं समन्स देऊन गेल्या काही दिवसांत त्यांची चौकशी करत जबाब नोंदवला होता.