मुंबई : मुंबईतून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातानं संपूर्ण शहर हादरून गेलं आहे. मुंबई उपनगरातील गोरेगाव पूर्व-पश्चिमेला जाणाऱ्या उड्डाणपुलावरून तब्बल २० फुट खाली दुचाकी कोसळली आहे. या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला असून दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास गोरेगावच्या उड्डाणपुलावर घडली. वैभव गमरे (वय-२८) आणि आनंद इंगळे असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाची नावे आहेत.
या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पूर्व-पश्चिमेला जाणाऱ्या उड्डाणपुलावरून दोन तरुण दुचाकीवरून जात होते. त्यावेळी त्यांची दुचाकी पुलावरुन थेट खाली कोसळली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.
या अपघातानंतर दोघांना तातडीने जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास गोरेगाव पोलीस करत आहेत.