मुंबई : खेळता खेळता रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या कारमध्ये जाऊन बसलेल्या दोन भावंडांचा कारमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना अँटॉप हिलमध्ये घडली. साजिद शेख (७) आणि मुस्कान शेख (५) अशी मृत मुलांची नावे आहेत. या प्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत अधिक तपास करत आहेत.
अँटॉप हिल, सीजीएस कॉलनीतील सेक्टर ५ मध्ये मोहब्बत शेख हे कुटुंबासोबत राहतात. ते मिस्त्रीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांची दोन मुले साजिद आणि मुस्कान नेहमीप्रमाणे सकाळी १०च्या सुमारास खेळण्यासाठी घराबाहेर पडले. खेळता खेळता दोघेही रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या कारमध्ये जाऊन बसले. कार लॉक होऊन दोघेही आत अडकले.
दुपार झाली तरी मुले जेवायला न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, दोन्ही मुले सापडली नाही. दोन्ही मुले लंगरमध्ये जेवायला गेली असतील अशा समजातून कुटुंबीयांनी त्यांचा अधिक शोध घेतला नाही. परंतु, संध्याकाळ झाली तरी मुले घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा पुन्हा शोध घेतला. मात्र, मुले न सापडल्याने अखेर कुटुंबीयांनी अँटॉप हिल पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
सर्वप्रथम पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता, मुले परिसरातून बाहेर गेली नसल्याचे समोर आले. पुढे, याच परिसरात शोधकार्य राबवण्यात आले. त्याचवेळी एका महिला पोलिसाने या परिसरात धूळ खात पडलेल्या कारवर लाईट मारताच दोन्ही मुले दिसून आली. पोलिसांनी तत्काळ कारचा पुढचा दरवाजा उघडून दोघांना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी दोन्ही मुलांना मृत घोषित केले. मुले खेळताना कारमध्ये बसली. मात्र, त्यानंतर कारचा दरवाजा आतून लॉक झाल्याने मुलांना बाहेर पडता आले नाही. आतमध्येच गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.