पालघर : देशात महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. त्याविरोधात देशभरात आंदोलनं सुद्धा सुरु आहेत. मात्र, अजूनही महिलांविरोधात घडणारे गुन्हे कमी होत नाही आहे. अशातच आता पालघरमध्ये गणेश उत्सवातून घरी परतणाऱ्या 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
राहुल गेंडे (वय-41) आणि शाहू ऊर्फ लंबू (वय-35) असे आरोपींचे नावे आहेत. या आरोंपीवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि पोक्सो कायद्यान्वये सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्वेकडील शिर्डीनगर भागामध्ये एक 10 वर्षांची मुलगी कुटुंबासोबतत राहते. ही मुलगी गणेशोत्सवादरम्यान, परिसरात गणेशाचे आगमन पाहण्यासाठी गेली होती. त्यावेळी (दि.02 सप्टेंबर रोजी) तेथून घरी निघाल्यानंतर दोन जणांनी तिला घराजवळील रस्त्यावर अडवून निर्जन स्थळी नेले आणि एक-एक करून तिच्यावर बलात्कार केला.
पीडित अल्पवयीन मुलीचे कपडे रक्ताने माखलेले आढळल्याने आपल्या मुलीसोबत काहीतरी गडबड झाल्याचा संशय तिच्या कुटुंबातील सदस्यांना आला. यानंतर मुलीची चौकशी केली. मुलीने घडलेली सर्व हकिकत तिच्या आई-वडिलांना सांगितले. त्यानंतर तिच्या आईने जवळच्या आचोळे पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली.